कृषीधारुर

रखडलेल्या अरणवाडी तलावाचे काम आता पूर्णत्वाकडे

धारूर / प्रतिनिधी
शहरालगत घाट पायथ्यालगत असलेल्या अरणवाडी साठवण तलावाचे काम विविध कारणामुळे मागील पंधरा वर्षापासून रखडले होते. अाता या तलावाचे काम पूर्णत्वाकडे अाले आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे तलावातील पाणीसाठ्यातही वाढ झाली अाहे. अरणवाडी साठवण तलावाचे काम पूर्ण झाल्यास अरणवाडी, चोरांबा, थेटेगव्हाण, पहाडी पारगाव, प. दहिफळ या गावच्या एक हजार हेक्टरपेक्षा अधिक जमिनी ओलिताखाली येणार आहेत. या तलावाचे उद्घाटन तत्कालीन ऊर्जामंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाले होते. परंतु या तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा, निधीचा प्रश्न, गुत्तेदाराचे दुर्लक्ष अादी विविध कारणांनी तलावाचे काम पंधरा वर्षापासून रखडले होते. तलावाचे काम पूर्ण व्हावे म्हणून अनेक दिवसांपासूनची शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु काम रखडल्यामुळे तलाव होईल का नाही अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये वाढली होती. गतवर्षी आमदार सोळंके यांनी या रखडलेल्या तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले होते. राहिलेल्या कामाचे नवीन टेंडर करून कामाचे उद्घाटन केले होते. नंतरच्या गुत्तेदाराने कामही वेगाने केले. मागील दीड वर्षाच्या कालावधीत तलावाला मातीचा भराव, सांडव्याचे काम अाणि यावर्षी धार कोंडण्याचे काम करण्यात आले. धार कोंडताना नदीपात्रात वाहणाऱ्या पाण्यामुळे यात काहीसा पाण्याचा साठा वाढला होता. त्यातच मागील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नदी-नाल्याला पूर आला होता. यामुळे या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे धार कोंडण्याचे काम गतीने केले. आणखी पाऊस झाल्यास तलावास धोका निर्माण होईल, अशी अधिकाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. कामाला वेग आल्याने अवघ्या पंधरा ते वीस दिवसांत राहिलेले काम पूर्ण करण्यात आले. धार कोंडण्याचे काम अंतिम टप्प्यात अाहे. अाठ ते दहा दिवसांत काम पूर्ण होणार आहे. रखडलेल्या या तलावाचे काम या वर्षी तब्बल पंधरा वर्षानंतर पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त हाेत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!