सलग दुसऱ्यांदा ‘आषाढी’वर कोरोनाचे सावट..!
महासंदेश : सध्या महाराष्ट्रावर करोनाचे संकट असून, जास्त भाविक एकत्र आले तर त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, शासनाने योग्य नियोजन करून, मोजक्या वारकऱ्यांना पायी वारीसाठी परवानगी द्यावी. त्यांचे लसीकरण करण्यात यावे. प्रत्येक दिंडीतील किमान दोन वारकऱ्यांसह पायी पालखी सोहळ्यास परवानगी द्यावी. अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. पंढरपूर येथे प्रातांधिकाऱ्यांसोबत वारकरी संप्रदायाची बैठक पडली त्यावेळी ही भूमिका मांडली.
मागील वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्याऐवजी एसटी बसने पालखी पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. परंतु अद्यापही कोरोनाचे सावट कायम असून यंदा मात्र पायी पालखी सोहळयास परवानगीसाठी वारकरी संप्रदाय आग्रही आहे.
यंदा दि.२० जुलै रोजी आषाढी एकादशी असून दि.१ जुलै रोजी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर दि.२ जुलै रोजी श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात करोना बाधितांची मोठी संख्या आहे.अशा परिस्थितीत सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा प्रश्न सरकारपुढे आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी विधानभवन येथे देहू,आळंदीसह मानाच्या सात पालखी सोहळा प्रमुखांची बैठक होणार आहे.