स्वाराती रूग्णालयाला उपकरण खरेदीसाठी ८८ लाखाचा निधी

अंबाजोगाई / प्रतिनिधी
म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीतून ८८ लाख रुपयांचा निधी मिळवून दिला आहे. या आधुनिक उपकरणामुळे रुग्णावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना उपयोग होणार आहे.
या आजारातील रुग्णावर उपचार करण्यासाठी इंडेस्कोपी सर्जरी करावी लागते. यावेळी मायक्रो डीब्रायडर इंडोस्कोपी युनिट महत्वाचे असते. हे युनिट खरेदी करण्यासाठी तसेच इंफ्युजन पंप खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालक मंत्री धनंजय मुंडे यांनी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याचे स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले
राज्यात दुसरा क्रमांक
येथील स्वाराती रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ९० रूग्णांवर ११५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया करणारे स्वाराती रुग्णालय हे राज्यातील दुसर्या क्रमांकाचे ठरले आहे. उपचार चांगले मिळत असल्याने या ठिकाणी जवळच्या जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येतात. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्जरीसाठी आधुनिक उपकरण खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने लोकांना चांगले उपचार मिळणार आहेत.