
एस. जाचक/ममदापूर:
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर ते पाटोदा या दरम्यान असलेल्या लेंडी नदीवरील पूल काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खचला असून पूलाच्या सिमेंटचे पाईप उघडे पडले आहेत. या पूलाचा काही भाग वाहून गेल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी पाटोदा मंडळांमध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झाली आहे. मुसळधार झालेल्या पावसामुळे परिसरातील नद्यांना पूर आला होता. रस्त्यावरून पाणी वाहू लागल्याने वाहनांची ये-जा ठप्प झाली होती. ममदापूर ते पाटोदा या रस्त्यावर असलेल्यांनी लेंडी नदीला आलेल्या महापूरामुळे नदीवर असलेला पूलाची माती वाहून जावून पूल खचला आहे. या पुरामुळे पुलाची एक बाजू ढासळली असून पूलाच्या सिमेंटचे पाईप उघडे पडले आहेत. खचलेला पूल तात्काळ दुरुस्त करून होणारा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी पाटोदा ममदापुर परिसरातील नागरिकांनी केली.
अपघाताची शक्यता
उघड्या पडलेल्या पाईपच्या आजूबाजूला झाडे वाढल्यामुळे हा पूल खचला आहे. हे या पूलावरुन जाणाऱ्या वाहन चालकांना दिसून येत नाही. यामुळे वाहनांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी पूलावरील खड्यात जावून दुचाकीस्वार जखमी झाल्याची ही घटना घडलेली आहे.