लेख

‘मूकनायक’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर -डॉ.सचिन बनसोडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, ‘विचार हे नाशवंत नसतात ही कल्पनाच मुळात चूकीची असून ज्याप्रमाणे एखाद्या रोपट्याला मोठे होण्यासाठी पाण्याची आणि खताची गरज असते, त्याच प्रमाणे एखाद्या विचाराला मोठे होण्यासाठी प्रचार आणि प्रसाराची गरज असते. जर विचारांचा प्रसार प्रचार केला नाही तर ते सुद्धा मृत होतात’. त्यादृष्टिने विचार करता प्रबोधन आणि प्रसाराचे साधन म्हणून माध्यमांचे किंवा वर्तमानपत्राचे किती महत्व आहे हेच स्पष्ट होते. बहिष्कृत समजल्या गेलेल्या लोकांमध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार करणे, त्यांच्यांत जागृती घडवून आणणे, त्यांच्यात समता, स्वातंत्र्य आणि न्याय ही तत्त्वे रूजविणे, समताधिष्टीत समाजाच्या पुर्नस्थापनेसाठी बहिष्कृतांना संघटीत करणे, त्यांच्यात आत्मभान निर्माण करत त्यांना आंदोलित करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी ‘मूकनायक’ हे वर्तमानपत्र ३१ जानेवारी १९२० रोजी सूरू केले.
मूकनायक सुरू होण्यापुर्वी ब्राह्मणेत्तरांची दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठा, ज्ञानप्रकाश आणि सुबोधपत्रिका अशी काही वर्तमानपत्रे सुरू होती. त्यातून बहिष्कृतांच्या प्रश्नांवर कमी अधिक प्रमाणात लेखन होत असे. पण ते पर्याप्त नसल्याचे आंबेडकरांचे मत होते. त्यामुळेच त्यांनी बहिष्कृतांच्या प्रश्नांवर स्वतंत्र वर्तमानपत्र सुरू केले. ‘मूकनायक’च्या पहिल्या अंकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध होत असलेल्या ब्राह्मणेत्तर वर्तमानपत्रांसंबंधाने भाष्य करतात. त्यातूनच त्यांची पत्रकारितेविषयीची भुमिका स्पष्ट होते.
वर्तमानपत्र सुरू करण्याविषयीची भुमिका मांडताना डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘ब्राह्मणेत्तर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या वर्तमानपत्रातून अनेक जातीच्या प्रश्नांचा खल होतो. त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग उहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही, हेही पण उघड आहे. त्यांच्या अतिबिकट स्थितीविषयी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी ‘मूकनायक’ या पत्राचा जन्म होत आहे.’ ब्राह्मणेत्तरांची जी वर्तमानपत्रे निघतात त्यातून बहिष्कृतांच्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा करण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नसल्याने व एका स्वतंत्र पत्राची गरज असल्याने हे पत्र सुरु केले असे ते स्पष्टपणे म्हणतात.
मूकनायक सुरू करण्यामागील त्यांची ही भूमिका अत्यंत परखड आणि कुणासही पटण्यासारखी आहे. तर वर्तमानपत्राचे ध्येय काय आहे? याचे प्रतिप्रादन करताना डॉ. आंबेडकर म्हणतात, “आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाय योजना सुचविण्यास, तसेच त्याची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत. त्यांना इतर जातीच्या हिताची पर्वा नसते. इतकेच नव्हे तर केंव्हा केंव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात.” यावरून मूकनायक या पत्राचे काय ध्येय होते हे स्पष्ट केले आहे.
डॉ. आंबेडकरांनी मूकनायक या पत्राचे ध्येय स्पष्ट करताना दोन-तीन महत्त्वाचे मुद्दे चर्चिले आहेत. एक म्हणजे बहिष्कृतांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविणे. दुसरे हे की, बहिष्कृतांच्या भावी उन्नतीचे मार्गाची खऱ्या स्वरुपाची चर्चा करणे आणि तिसरे असे की, मुंबई इलाख्यात निघणारी जी वर्तमानपत्रे आहेत, ती केवळ विशिष्ट जातींचे हितसंबंध पाहणारी व इतर जातींच्या हिताची पर्वा नसणारी आहेत. इतकेच नव्हे, तर ती इतर जातींचे अहित होईल अशा स्वरूपाचे कार्य करणारी आहेत. अशी परखड मांडणी करत तत्कालीन पत्रकारितेतील कोणकोणते प्रवाह कशा प्रकारे कार्य करताहेत यावर ते नेमकेपणाने भाष्य करतात.
अशा सगळ्या पार्श्वभुमीवर डॉ. आंबेडकर ‘मूकनायक’ या पत्राची सुरुवात करतात. त्यात ते बहिष्कृतांच्या प्रश्नांची सांगोपांग चर्चा करतात. बहिष्कृतांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर प्रभावी उपाययोजना काय करता येतील याबाबत भूमिका मांडतात. ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तरांच्या भूमिकांचाही समाचार घेत बहिष्कृतांच्या मुक्तीचा विचार तळागाळात पोहोचवण्याचे कार्य करतात. त्याचसोबत येणाऱ्या पिढयांना दिशादर्शक ठरेल अशा सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक वैचारिक भूमिकांचा पाया रचतात. एकाअर्थी ‘मूकनायक’ हे वर्तमानपत्र भिमराव रामजी आंबेडकर यांनी मूक्यांचे नायक होण्याच्या तथा ‘बाबासाहेब’ होण्याच्या प्रक्रीयेची सुरुवातच म्हणता येईल. बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत ही वर्तमानापत्रे चालविली. त्यातील मूकनायक हे भारतातील बहिष्कृत जनतेला प्रबुद्ध करण्याच्या वाटचालीतील पहिले पाऊल असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
डॉ. आंबेडकरांच्या वर्तमानपत्रातून जे कार्य झाले त्यात, बहिष्कृतांमध्ये अस्पृश्यांच्या व इतर मागासवर्गीयांच्या प्रश्नावर जागृती घडविण्यात आली. अस्पृश्यांना व त्यांच्या खऱ्या प्रतिनिधींना राजकीय सत्तेत वाटा मिळावा यासाठी कशा प्रकारे प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. जनतेला स्वराज्याचा खरा अर्थ समजावून सांगण्यात आला आहे. अस्पृश्यांच्या हक्काधिकाराविरोधात धोरण राबवणाऱ्यांचा कठोरपणे सामना करत त्यांचे खरे स्वरुप समोर आणण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे अस्पृश्यांचे आंदोलन, चळवळी आणि लढयाबाबत जनजागृती व या लढयाचे सविस्तर वार्तांकन केलेले आहे. अशा रितीने सर्वच विषयावर सर्वंकष लेखन करत बहिष्कृत ठरलेलया लोकांमध्ये चेतना निर्माण करण्याचे कार्य ‘मूकनायक’ या वर्तमानपत्राच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.
बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीची चर्चा करताना जे मुद्दे उपस्थित केले अगदी तशीच परिस्थिती आजदेखील आहे. मुख्यप्रवाही माध्यमांवर सवर्णांची पकड असल्याने विशिष्ट जातीचे आणि भांडवलादाराचे हितसंबंध जोपासण्यावरच त्यांचा भर असतो. मागास म्हणून गणल्या गेलेल्या घटकांच्या हिताची चर्चा ते करत नाहीत. उलट त्यांचे अहित कसे होईल अशा रितीने वार्तांकन करत बुद्धीभेद करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धीप्रामाण्यवाद, समता, स्वातंत्रय, न्याय या मूल्यांचा प्रचार प्रसार करण्यापेक्षा अज्ञानाचा, खोट्या राष्ट्रवादाचा प्रचार करणाऱ्या अमानवी आणि दंगेखोर लोकांना प्रसिद्धी देण्यात सवर्णांची पत्रकारिता धन्यता मानते. यामुळे संविधानिक मूल्यावर आधारीत कायद्याचे राज्य निर्माण करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. जातीवादी, धर्मांध, भ्रष्ट व्यक्तींचा उदोउदो करण्यातून देशात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात ही माध्यमे आघाडीवर आहेत. अशा प्रकारची अराष्टृीय, अमानवीय भूमिका घेवून पत्रकारिता करणाऱ्यांना आंबेडकरांनी जो इशारा दिला होता तो समजून घेणे महत्त्वाचे आहे.
विकृत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या प्रवृत्तीसंदर्भात डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘समाज ही एक नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणाऱ्या उतारूने इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा, जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटाबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने अप्रत्यक्षरित्या नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार, यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करावयाचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये.’ हा इशारा भारतीय माध्यमे व त्यात कार्यरत पत्रकार लक्षात घेतील, अशी शक्यता कमीच आहे. कारण मागास जातींचे नुकसान करण्यातच सवर्णांचे हित आहे, अशी त्यांची धारणा बनलेली आहे. तरीही या देशाचे आणि देशातील विविध घटकांचे अहित होऊ नये म्हणून बाबासाहेबांचा इशारा विनाशक विचारांच्या सवर्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी आंबेडकरी प्रचारक, पत्रकार यांनी सातत्याने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

लेखन: डॉ. सचिन बनसोडे
(औरंगाबाद)

संपादन: प्रदीप तरकसे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!