
अंबाजोगाई: तालुक्यातील बागझरी येथे विषबाधा झाल्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी घडली. शुक्रवारी रात्री या कुटूंबातील सदस्यांनी अंड्याची भाजी खाल्ली होती. त्यांनतर त्यांना उलट्या होत होत्या. ज्या दुकानातून ही अंडी आनली होते ती अंडी पोलिसांनी जप्त केली असून ती प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवीण्यात येणार आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील बाझरी येथील काशीनाथ धारासुरे यांच्या कुटूंबातील सदस्यांनी अंड्याची भाजी खाल्याने पत्नी, दोन मुली व एक मुलगा यांना विषबाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सकाळीच साधना, श्रावणी व नारायण या मुलांचा मृत्यू झाला तर सायंकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान भाग्यश्री काशीनाथ धारासुरे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. काशीनाथ धारासुरे यांनी गावातील ज्या दुकानातून अंडी आणली होती, त्या दुकानातील अंडी पोलिसांनी जप्त केली असून ती प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांचा घटनास्थळी जावून पंचनामा
अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, पोलिस उपअधीक्षक सुनील जायभाये, सहायक पोलिस निरीक्षक अशोक खरात, देवानंद देवकते, एल. आर. बिडगर यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी बर्दापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद केली. बीडचे अन्न सुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड यांनीही शनिवारी रात्री घटनास्थळी भेट देत पाहणी केली.