पिंपळनेर येथे दोन बार व एक किराणा दुकान फोडले, लाखोंचा ऐवज लंपास

पिंपळनेर / प्रतिनिधी: बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या किराणा दुकानात व दोन बार मध्ये चोरट्यांनी हात साफ करत लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना दि.२ मे रोजी सोमवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
पिंपळनेर येथे गत काही दिवसापासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून किरकोळ चोर्या केल्या जात होत्या, परंतु सोमवारी पहाटे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुभाष चरखा यांच्या मालकीच्या तिरुपती किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी सामान लंपास केले आहे, तसेच रोख रक्कम ही लंपास करण्यात आली आहे. तसेच नाथापूर चौकात असलेल्या पेंढारे यांच्या जय बार मध्ये दारूचे ३५ ते ४० बॉक्स व जवळपास ३५ हजार रोख रक्कम तसेच बीड रोडवर असलेल्या शरद जवळकर यांच्या यश बार मध्येही दारूच्या बाटल्या चे ३८ ते ४० बॉक्स व जवळपास दिड लाख रोख रक्कम लंपास करण्यात आली आहे. या घटनेची माहिती सोमवारी सकाळी संबंधित मालकांना झाल्यानंतर पोलिसांना या चोरीची कल्पना देण्यात आली. यानंतर पिंपळनेर पोलिसांनी उशिरापर्यंत घटनेचा पंचनामा केला व अज्ञात चोरट्यांनी विरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.