वाटमारीच्या तयारीतील सशस्त्र टोळी पकडली

बीड /प्रतिनिधी:
मांजरसुंबा रोडवर संभाजी चौकाजवळ बायपासच्या बाजूला वळणावर वाटमारीच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सदर माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत पाठलाग करून सहा दरोडेखोरांना ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. बुधवारी (दि.१६ ) रात्री ही कारवाई करण्यात आली.
बीड मांजरसुंबा रोडवरील संभाजी चौकातील बाह्यवळणाजवळ काही चोरटे वाहनांना लुटण्याच्या उद्देशाने दबा धरून बसले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तातडीने संभाजी चौकाकडे धाव घेतली शोध सुरु केला. यावेळी पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्या अशोक बबन जाधव आणि विकास भरत गायकवाड (दोघेही रा. गांधीनगर, बीड) या दोघांना पाठलाग करून पकडले. यावेळी इतर चौघांनी कारमध्ये बसून बीडच्या दिशेने पळ काढला.
पोलिसांनी वाहनातून त्यांचा पाठलाग सुरु केला असता ते बार्शी नाक्याहून तेलगाव नाक्याकडे पळाले. मात्र पुढे नाळवंडीकडे जाणारा रस्ता ते गांधीनगरमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी त्यांना गाठले. त्याच्या गाडी समोर गाडी आडवी पोलिसांनी झडप घालून रवी लक्ष्मण जाधव, भीमा शामराव जाधव, राजेंद्र सूर्यभान गायकवाड (सर्व रा. गांधीनगर, बीड) आणि दीपक बाबासाहेब ढवळे (रा. सौंदाना ता. बीड) या चौघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्या सहा जणांकडून दोन तलवार, लोखंडी रॉड, सुती दोरी, मिरची पूड, मोबाईल, रोख रक्कम आणि कार असा एकूण ३ लाख ३६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुलत यांच्या फिर्यादीवरून सर्व आरोपींवर ईद ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर. राजा, अपर अधीक्षक सुनील लांजेवार आणि गुन्हे शाखा निरीक्षक भारत राउत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत व सहकाऱ्यांनी केली.
21 जूनपर्यंत पोलीस कोठडी
पोलीसांनी सर्व आरोपींना गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्या सर्वांना 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.