लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षीही उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनी घरातच

माजलगाव /प्रतिनिधी
दरवर्षी एप्रिलमध्ये परीक्षा होवून मे महिन्यामध्ये शाळकरी मुलांना तसेच बालगोपाळांना शाळेला सुट्या असतात, परंतु सद्यःस्थितीत याच कालावधीमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन केल्याने बच्चे कंपनींचे मामाच्या गावाला जावून धमाल करण्याचे स्वप्न भंगले आहे.
दरवर्षी शाळेच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्या लागल्या की, शाळकरी मुल-मुलींना मामांच्या गावाला जाण्याची ओढ लागते. कोरोना संसर्गामुळे सलग दुसऱ्या वर्षी परीक्षा रद्द करण्यात आल्या असून लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सेवाही बंद आहेत. कोरोनाने बालगोपाळांचा हिरमोड केला आहे. मामाच्या गावाची ओढ लागलेल्या बालगोपाळांना या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्या घरातच घालवाव्या लागत आहे. सुट्यांमध्ये दरवर्षी लग्नसराईची धूम असते, तसेच याच कालावधी मध्ये आंबे सुध्दा असतात. मामा, मावशीची मुले-मुली व त्या-त्या गावातील मित्र हे सर्व एका ठिकाणी याच काळात भेटून धमाल करत असतात. मोबाइल व संगणकाचे वेड लागलेल्या मुलांमध्ये मामाच्या गावाचे धमालीचे कुतूहल संपल्यातच जमा आहे, तर काहींची मात्र मामाच्या गावाची ओढ अधिकच तीव्र होत असून ते आपल्या मामांना वेळोवेळी मोबाइलवर संपर्क करून आम्हाला घेण्यासाठी येण्याचे साकडे घालत असून प्रसंगी रडत असल्याचे दिसतात.
मुलांचा मोर्चा आता संगणक, मोबाइलकडे
यावर्षी सुद्धा सुट्या लागताच मामाच्या गावी जावून धमाल करण्याचे नियोजन बालगोपाळांनी केले होते, परंतु या वर्षी कोरोनामुळे घरातच राहावे लागत आहे. नाइलाजास्तव या मुलांनी आपला मोर्चा आता संगणक, मोबाइलवरील गेम, तसेच घरातच चंफुल, लपाछपी यासारखे खेळ खेळून व टिव्हीवर कार्टून पाहून वेळ घालवताना दिसत आहे.