चोरीला गेलेला मुद्देमाल दिला मालकाच्या ताब्यात

गौतम बचुटे/केज :- केज येथील एका बांधकामा वरून चोरीला गेलेली पाण्याची मोटार व इतर साहित्याचा पोलिसांनी तपास करून तो मुद्देमाल मालकाच्या ताब्यात दिला.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील सहशिक्षक भिमराव धिवार यांचे बीड रोड लगत असलेल्या टेलिफोन ऑफिसच्या पाठीमागील बाजूस समता नगर येथे घराचे बांधकाम सुरू आहे. दि १२ फेब्रुवारी रोजी भिमराव धिवार यांच्या बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या बोअर मधील मोटार, वायर व इतर साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. त्या बाबत भीमराव धिवार यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु. र. नं. ३६/२०२२ भा. दं. वि. ३७९ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल करून प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर व मंगेश भोले हे तपास करीत होते.
दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर व मंगेश भोले यांनी तपास करून केज येथील क्रांतिनगर मधील प्रभु बापू काळे यांच्या कडून वायर आणि रस्सी ताब्यात घेतली. अधिक चौकशी केली असता चोरीला गेलेली पाण्याची बोअर मधील मोटार ही जिवाचीवाड़ी येथील हरिभाऊ निवृत्ती चौरे यांच्याकडे असल्याची माहिती मिळताच मुद्देमालासह दोन्ही आरोपी ताब्यात घेतले. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशा नुसार मुद्देमाल धिवार यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर, महादेव बहिरवाळ, दिलीप गित्ते, अमर घुले आणि मंगेश भोले हे उपस्थित होते. चोरीचा तपास करून मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ मालकाच्या ताब्यात दिल्या बद्दल नागरिकांतून केज पोलीसांचे कौतुक होत आहे.