महिनाभरापासून रस्ता खाेदून ठेवल्यने नागरिकांची काेंडी

माजलगाव/प्रतिनिधि
शिवाजी चौक ते बायपास रोडपर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू आहे. मागील महिनाभरापासून येथील रस्ता खोदून ठेवलेला आहे. परंतु, काम मात्र कासवगतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांची कोंडी होऊन बसली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केल्यास जुजबी कारणांची सरबत्ती करत ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे.
शहरातील शिवाजी चौकापासून ते बायपास रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ते येणार म्हणून रात्रीतून उरकला होता. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याची पार वाताहत झाली. मुख्य रस्त्याला लागून असलेला हादेखील महत्त्वाचा रस्ता असून मोठ्या प्रमाणात रहदारी असलेला रस्ता. या रस्त्याच्या कामासाठी नगर परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग झालेल्या पैशामधून सिमेंट रस्त्याचे काम या ठिकाणी होत आहे. एक महिन्यापूर्वी या रस्त्याच्या कामाला नगरसेवकांनी उद्घाटनाच्या नारळापुरती उपस्थिती दर्शवली. मात्र, नंतर काय झाले हे पाहायला देखील ते आले नाहीत. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, न्यायालय, शासकीय विश्रामगृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय या सर्व कार्यालयांना जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता अाहे. या रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याने कार्यालयीन कामासाठी जाण्या-येण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. अडीच कोटी रुपये खर्चून या रस्त्याचे काम होत आहे. परंतु, दिरंगाईमुळे मोठ्या अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता विविध जुजबी करणे देत गुत्तेदाराची पाठराखण करण्याचे काम होत असून त्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.