लेख

देश विकासात ‘युवाशक्ती’ चे योगदान


देश हा जेवढा व्यापक शब्द आहे, त्यापेक्षाही एक व्यापक प्रश्न असा आहे की, देश कोण बनवितो ? नेता, सरकारी कर्मचारी, शिक्षक, मजुर, वरिष्ठ नागरिक की आणखीन कोण ? खरं तर हे सगळे मिळून देश बनवत असतील, मग तरी इथे एक महत्वाचा प्रश्न असा पडतो की, देशाच्या विकासात सर्वात मोठी भागीदारी कुणाची आहे ? नक्कीच या पैकी कुणाची नाही. देशाच्या विकासात सिंहाचा वाटा त्या वर्गाचा आहे ज्या वर्गाचा वर उल्लेख झालेला नाही, तो म्हणजे युवक वर्ग. कोणत्याही देशाची खरी संपत्ती व शक्तीस्थान हे त्या देशाचे युवक असतात. देशातील युवकांच्या दर्जावरुन त्या देशाचे भवितव्य कसे असेल हे ठरत असते. म्हणून आपल्याला देशाचे भवितव्य उज्वल हवे असेल तर प्रथम आपल्या युवकांना अधिक सक्षम, विधायक व सामर्थ्यवान बनवणे गरजेचे आहे.

युवक हा असा वर्ग आहे जो शारीरिक आणि मानसिक रुपाने सर्वात बलवान आहे. जो देशाच्या आणि समाजाच्या विकासासाठी सर्वात जास्त प्रयत्न करु शकतो. सुदैवाने आपल्या भारतीय लोकसंख्येच्या ३४ टक्के इतकी लोकसंख्या युवकांची म्हणजेच २४ ते ४० वर्षे वयोगटाची आहे. हा युवक वर्ग नेहमीच सामाजिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्या रुपाने सदैव सर्वात जास्त सक्रीय असतो आणि रहायलाही हवा. मात्र कोणत्याही देशाच्या बांधणीत महत्वपूर्ण भूमिका बजावणा-या या युवक वर्गाची आजची स्थिती बघितली तर ती निश्चितच चिंताजनक आहे. भारतीय युवकांची स्थिती चिंताजनक आहे असे म्हटल्यावर याचे देशावर काय परिणाम होतील हे वेगळे सांगायला नको. आजचा युवक व्यसनांच्या आहारी गेलेला, भ्रष्ट राजकारणी व चित्रपटातील अभिनेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणारा, गुन्हेगारी प्रवृती व दहशतवादाकडे वळलेला दिसतो. या स्थितीला फक्त युवकच जबाबदर आहे असे म्हणून आपल्याला आपली जबाबदारी झटकून मोकळे होता येणार नाही. का कधी युवकांच्या या अवस्थेकडे लक्षपूर्वक बघितलं ? कोणी कधी त्यांच्या भाव-भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न केलाय ? स्पष्टपणे म्हटलं तर नाही. मग आजची युवक पिढी इतकी बेजबाबदार, मनमानी करणारी का आहे ? जेंव्हा आपण भारतीय युवकांच्या वर्तमानकालीन स्थितीबद्दल भळभळून बोलतो, त्यांच्या भविष्याच्या बाबतीत चिंता व्यक्त करतो तेंव्हा आपण भूतकाळात डोकावून बघितले पाहिजे. स्वातंत्र्यपूर्व काळात भगतसिंग, राजगुरु, चंद्रशेखर आजाद, सुखदेव हे युवक त्या काळच्या युवकांचे आदर्श आणि प्रेरणास्थान होते. ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. प्रसंगी प्राणाचेही बलिदान दिले. देशासाठी हसत-हसत फासावर चढणा-या या देशवेडया तरुणांना पाहून समकालिन युवकांच्या रक्तात एक वेगळा उत्साह संचारत होता. ते युवक या तरुणांना आपला आदर्श मानत मात्र त्यांनी कधी याची जाहीरात बाजी केली नाही. भूतकाळ जेवढा खराब तसा वर्तमान त्याची सावली आणि भविष्य तर आणखीनच खराब. ऐकायला-वाचायला या गोष्टी नक्कीच निराशाजनक वाटतील परंतु थंड डोक्याने आपण जर विचार केला, स्वत:लाच जर प्रश्न विचारला की, आजच्या युवक पिढीला मागच्या पिढी ने काय ‘वारसा’ दिलाय ? कसले संस्कार आणि कसला समाज दिलाय ? तर आजच्या युवकांच्या या अवस्थेचे उत्तर आपल्याला निश्चित मिळेल. मी भूतकाळाबद्दल बोलतोय म्हणजे निश्चितच स्वातंत्र्यपूर्व काळाबद्दल बोलत नाही. मी बोलतोय ते स्वातंत्र्योत्तर काळाबद्दल म्हणजे गेल्या ७३ वर्षांबद्दल. या काळातील पिढीने देश बांधणीचे काम केले आहे. काय बघितल आपण या ७३ वर्षात ? वाढत चाललेली गुन्हेगारी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा असेही म्हणता येईल की गुन्हेगारांचे राजकीकरण, वाढत चाललेला भ्रष्टाचार, वाढता जातीयवाद आणि बेरोजगारी. जेवढं काही वाईट होवू शकत ते मागील पिढीने केल. अर्थात सगळ्याच गोष्टी वाईट केल्या असं नाही. प्रत्येक समाजात काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी असतातच मात्र भूतकाळात वाईट गोष्टींनाच जास्त खत-पाणी दिल गेल हे सत्य आहे. जर असा समाज युवकांच्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून असेल तर आजच्या युवक पिढीला दोष देवून काय उपयोग ? आमचे आदर्श म्हणजे आजचे वृध्द राजकीय नेते ज्यांचे मोठे-मोठे होर्डींग्ज आदर्श म्हणून आजचे युवक लावताना दिसतात. हे सगळेच नेते वाईट आहेत असेही नाही. काही अपवादात्मक राजकीय नेते सोडले तर इतर सर्वांवर कसला न कसला भ्रष्टाचाराचा आरोप आहे.

भारतीय युवक एक नवक्रांती करायला तयार आहे, मात्र त्याला कुणीतरी रोखू पाहतयं ते म्हणजे राजकीय क्षेत्र आणि त्यातील भ्रष्ट राजकारणी. राजकारणात देशप्रेमाची जागा घराणेशाही, जातीयवाद, सत्तेच्या हव्यासाने घेतली आहे. राजकीय क्षेत्रात फक्त वयस्कर लोकांचाच बोलबाला आहे आणि फक्त बोटावर मोजण्याइतकेच युवक आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्राचे वातावरण दिवंसेदिवस गढुळ होत चालले आहे. ख-या प्रामाणिक राजकारण्यांची जागा सत्ता आणि धनाच्या लालची लोकांनी घेतली आहे. आता भारताच्या राजकारणात सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लोकमान्य टिळक या सारखे युवक नेते नाहीत जे युवक वर्गात एक नवा उत्साह भरतील. जे नेते आज स्व:ताचे रक्षण करु शकत नाहीत ते आजच्या युवक पिढीला देशभक्ती किंवा क्रांतीचे धडे काय देणार ?

आपन कल्पना करु की, काही काळासाठी (५ वर्षाचा कालावधी तसा देश विकासासाठी खूप कमी असतो हे आजच्या राजकारण्यांनी सिध्द केलयं) राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले नसते तर या देशाचे काय झाले असते, आजही आपण कदाचित बैलगाडीने प्रवास केला असता व कंदीलाच्या प्रकाशात राहिलो असतो. देशाच्या या एकमेव पंतप्रधानाने देशाच्या विचारात एक नवा उत्साह निर्माण करण्याचे काम केले. त्याच्या फलस्वरुप देशाने प्रगतीचे शिखर गाठले. ज्या वेळी या तरुण नेतृत्वाने भारतात सर्वप्रथम संगणक आणला त्यावेळी तत्कालिन वृध्द नेत्यांनी याचे हसे केले होते, सर्वत्र बेरोजगारी वाढेल अशी बोंब उठवली होती. दिल्लीहून निघालेला एक रुपया खालपर्यंत पोहचेपर्यंत पंधरा पैसे राहून जातो हे वाक्य याच नेत्याने प्रामाणिकपणे बोलून युवक वर्गाला भ्रष्टाचाराच्या धोक्याची जाणीव करून दिली होती. मात्र या युवक नेतृत्वाच्या अकाली मृत्यूने देश म्हणावा तेवढा प्रगती करु शकला नाही.

आजचा युवक निराशेच्या गर्तेत आहे, तो बेरोजगारीची मार खातो आहे. भारतीय नेतृत्व त्याला योग्य संधी देण्यात अपयशी ठरल आहे. इथे योग्य संधी मिळत नाही म्हणून बरेचशे उच्चशिक्षित युवक विदेशात जावून काम करित आहेत. भारतातील ७५ टक्के युवक साक्षर असताना त्यांच्या हाताला काम नाही. त्यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जातो नंतर मात्र त्यांना धान्यातून खडे वेचून बाजुला करावे तसे केले जाते. युवकांनी राजकारण्यांच्या पाठीमागे लागून,त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वत:च्या मेहनीतीने स्वत:चे करिअर बनवण्याचा, उद्योजक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर उदयोजक झालात तर हेच राजकारणी आपल्याला शोधत फिरतील. ‘आजचे युवक भरकटलेले आहेत’असे म्हणण्याचा हक्क आजच्या पिढीला बिलकुल नाही. दुस‌-यांकडे बोट दाखविणा-यांनी स्वत:कडे उठणा-या चार बोटांकडेही बघितले पाहिजे. युवकांना नावे ठेवणा-या पिढीने त्यांच्या समोर कोणता आदर्श निर्माण केलाय ? अनिंयत्रीत लोकसंख्या वाढीने अनेक समस्या निर्माण करणा-या पिढीने बेरोजगार, भरकटलेल्या युवकांना बघून फक्त चिंता व्यक्त करुन चालणार नाही.भ्रष्टाचाराला यंत्रणा बनवणारी पिढी युवकांना ईमानदार राहण्याचा सल्ला देत आहे. देश असा बनत नाही.

आता वेळ आली आहे क्रांतीकारी पाऊल उचलण्याची. हा रोग एवढा मोठा झालाय कि आता याच्यावर ‘बायपास सर्जरी’ करावीच लागेल. परदेशात जाणा-या सॉफ्टवेअर, आय.आय.टी, इंजिनिअर, आय.आय.एम तरुणांना रोखण्याचे मार्ग आपण शोधले पाहिजेत. ते भारतात तेंव्हाच परत येतील जेंव्हा त्यांना इथे योग्य संधी उपलब्ध होतील. आपल्याला देशातील, खेडया-पाडयातील युवकांवर भर दयावा लागेल. या युवकांमुळेच देश घडेल. त्यांना बेरोजगारी भत्ता, आश्वासने, राजकिय प्रचार सभा, कायद्यापेक्षा वरचढ होण्याची शिकवण देवून चालणार नाही. जर या युवक शक्तीचा योग्य वापर केला नाही तर तिचा चूकीचा वापर होवू शकतो. हिच युवक शक्ती देशासाठी विध्वंसक व घातक ठरु शकते.
भारतीय युवकांचा उत्साह, त्यांची सर्जनशिलता, अष्टपैलुत्व आश्चर्यकरक आहे. त्यांना अधिक सक्षम बनवणे गरजेचे आहे.त्यांच्या समोर आपण काहीतरी आदर्श निर्माण केला पाहिजे. आपल्याला पुर्ण संधी मिळूनही आपण देशाला चांगले बनवू शकलो नाहीत. आता देशाला चालवण्याची संधी युवकांना द्या. देशाची बांधणी युवकच करतात आणि करतीलही, गरज आहे ती त्यांना पोषक वातावरण व योग्य प्रोत्साहनाची.

-सुरेश मंत्री,अंबाजोगाई.
संपर्क – ९४०३६५०७२२

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!