अंबाजोगाईच्या आयएमएकडून कोरोना योद्ध्यांचा सत्कार

अंबाजोगाई/प्रतिनिधी
इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा अंबाजोगाईच्या वतीने कोविडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योगदान देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा बुधवारी (ता.९ जून) लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरवर सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्वाराती रुग्णालयाचे मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, कोविड सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंद्रकांत चव्हाण, डॉ.अरूणा केंद्रे, बालरोग तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. गोपाळ पाटील, डॉ. विजय लाड, डॉ. संदीप मोरे, डॉ. बजाज, डॉ. शेख जुबेर, डॉ. सचिन पोतदार उपस्थित होते. डॉ. सिद्धेश्वर बिराजदार म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये महत्त्वाची भूमिका ही डॉक्टरांची व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची राहिलेली आहे. पाठीमागे कसलाही अनुभव नसतानाही लढाई लढलेली आहे. समाजाने सत्य स्वीकारून घेतले पाहिजे. डॉक्टरांनी ज्या पद्धतीने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केला. त्याची उतराई भलेही केली नाही तरी चालेल, परंतु डॉक्टरांविषयीचे मनातील गैरसमज दूर करून संवेदना दाखवावी, असे आवाहन बिराजदार यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्व डॉक्टर्स, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व सफाई कामगार गौरव करण्यात आला. डॉ. शेख जुबेर, डॉ. संदीप मोरे, डॉ. सचिन पोतदार, डॉ. जाधव, डॉ. गालफाडे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. रोशनी चांडेल व डॉ. मुकुंद चाटे यांनी केले तर आभार डॉ. किशोर हजारे यांनी मानले.