
बाजार समिती प्रशासक देशमुख यांची माहिती
अंबाजोगाई /प्रतिनिधी
शेतकऱ्यांना हरभरा शासकीय आधारभूत भावाने विकता यावा, यासाठी नोंदणी मुदत शासनाने वाढविली असून १८ जून २०२१ पर्यंत आता नोंदणी करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक गोविंद देशमुख यांनी दिली आहे.
देशमुख यांनी पत्रकात म्हटले आहे की, लॉकडाऊन व कोरोना महामारीच्या संकटामध्ये शेतकऱ्यांना आपल्या मालाची नोंदणी करणे अडचणीचे झाले होते. तसेच हरभरा नोंदणीसाठी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे होते. राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना आवश्यक तेवढी हरभरा नोंदणी करता आलेली नाही. मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले असले तरीही कोरोना सारख्या गंभीर आजारामुळे लॉकडाऊन असल्याने शेतकरी बाहेर पडून नोंदणी करू शकले नाहीत. माल घरात पण विकायचा कुठे या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा व नोंदणी मुदत वाढवावी यासाठी गोविंद देशमुख यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार संजय दौंड, महाराष्ट्र स्टेट को ऑप फेडरेशन चेअरमन बाबासाहेब पाटील, माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर राज्यशासनाने हरभरा खरेदी नोंदणीस मुदतवाढ दिली असून आता १८ जून पर्यंत नोंद करून हरभरा विक्री करून शासकीय आधारभूत किमतीचा लाभ घेता येणार आहे.