सख्या भावावर प्राणघातक हल्ला !

गेवराई/ प्रतिनिधी :
घराच्या किरकोळ वादातून सख्या भावांनी दुसऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी ( दि. १३) तालुक्यातील खामगाव येथे घडली. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सोमवारी (२१ जून) गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
खामगाव येथील किराणा व्यापारी विष्णु जिजाबा सिरसाट आणि त्यांचा सख्खा भाऊ नामदेव या दोघात घराच्या जागेचा वाद आहे. त्यावरून अनेकदा दोघात भांडणतंटे झाले आहेत. रविवारी (१३ जून) रात्री नामदेव, त्याची पत्नी मुद्रिका, मुले अशोक आणि सचिन हे चौघे विष्णू यांच्या घरासमोर आली. ही जागा आमचीच आहे. तुम्ही इथून निघून जा असे म्हणत त्यांनी वाद सुरु केला. थोड्याच वेळात वाद विकोपाला गेला आणि त्यांनी लोखंडी टांबी, लोखंडी गज आणि लाकडी काठीने विष्णू, त्यांचा मुलगा महेश, राहुल, सून ज्योती यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात विष्णू आणि महेश हे गंभीर जखमी झाले. त्यांचा आरडाओरडा ऐकून इतर ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांनी भांडणाची सोडवासोडव केली. यावेळी जागेसाठी तुझ्या कुटुंबाला संपवीन अशी धमकी देत नामदेव आणि त्याचे कुटुंबीय तिथून निघून गेले. गंभीर जखमी विष्णू आणि महेश या पिता-पुत्रावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. विष्णू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारही आरोपींवर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.