लेख

कोरोना बळींची संख्या खरी की खोटी

देशात बुधवारी ९ जुनला तब्बल ६ हजार १४८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका दिवसांत आत्तापर्यंत झालेले हे सर्वाधिक मृत्यू होते. तसेच जगात एका दिवसांत सर्वाधिक मृत्यू भारतात झाले. यापूर्वी भारतात सर्वाधिक मृत्यू १८ मे २०२१ रोजी झाले होते. त्यावेळी ४ हजार ५२९ मृत्यूची नोंद झाली होती. परंतु खरंच हे एका दिवसातील मृत्यू आहेत का ? देशातील अनेक राज्यांत मृतांची आकडेवारी लपवण्यात आली होती. कोरोनाच्या दुस-या लाटेत झालेल्या मृत्यूंच्या संख्येवर नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यात स्मशानात लागलेल्या मृतदेहांच्या रांगा आणि गंगेत सापडलेल्या मृतदेहांमुळे हा संशय अधिकच बळावला होता. आता खुद्द बिहार सरकारने कोरोना मृतांची संख्या लपवल्याची कबुली दिली आहे.
यामुळे आता ही संख्या दुरुस्त केली जात आहे. बिहार राज्यात आत्तापर्यंत ५ हजार ४२४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती होती. पण आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रत्यय अमृत यांनी राज्यात आत्तापर्यंत ९ हजार ३७५ रूग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. तसेच आकडेवारी देण्यात चूक झाल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे या क्रमवारीत बिहार १६ वरून १२ व्या स्थानावर पोहचले आहे. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मृत्यूदर ०.७६ टक्क्यांवरून १.३२ वर पोहचला आहे. पुर्वीची आकडेवारी आणि आत्ताची आकडेवारी यात ३९५१ मृत्यूंची तफावत आहे. यातील अनेक जणांचा मृत्यू काही आठवड्यांपूर्वी किंवा कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान झाल्याची शक्यता आहे. राज्यात झालेल्या कोरोना मृतांची आकडेवारीचा तपास करण्यासाठी बिहार सरकारने १८ मे रोजी दोन समित्या स्थापन केल्या होत्या. या समित्यांनी राज्यातील मृत्यूंचे ऑडिट केले. राज्यात मृतांच्या आकडेवारीत कमालीचा हलगर्जीपणा दाखवल्याचे स्पष्ट झाले.
आकडेवारी का चुकली याची कारणे प्रशासनाने दिली आहेत. अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते दुस-या जिल्ह्यात गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. काही रूग्णांचा मृत्यू रूग्णालयात नेताना झाला तर अनेक रूग्णांचा मृत्यू कोरोनातुन बरे झाल्यानंतर झाला. त्यामुळे कोरोना मृतांचा खरा आकडा कळला नाही असा तर्क प्रशासनाने मांडला आहे. मे महिन्यात पटना शहरातील तीन स्मशानभूमीं मध्येच १६४८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाला आहे, जेंव्हाकी सरकारी आकडा ४४६ चा आहे. जवळपास ७३ टक्के संख्या कमी दाखवण्यात आली. नविन संख्येच्या हिशोबाने पटना मध्ये कोरोना मृतांची संख्या २३०३ झाली आहे जी अगोदर १२२९ होती. एका वर्तमानपत्राच्या अहवालनुसार पटना मध्ये मरणा-यांची संख्या ५००० पर्यंत जावू शकते जेंव्हाकी सरकार जवळपास २३०० दाखवत आहे.
पटना ही बिहारची राजधानी आहे. येथील लोकांपासून कोरोनामुळे किती लोकांचा मृत्यू झाला हे लपवले गेले. जाहिर झालेली नविन संख्या सुद्धा योग्य संख्या आहे हे कोणीच सांगु शकत नाही. ७ जुनला कैमुर जिल्ह्यात ४४ लोकांचा मृत्यू झाला होता. यात सुधारणा करून आता १४६ करण्यात आल आहे. एकूण २३१ टक्के वाढ झाली. अशा पद्धतीने हिशोब लावा की मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात किती संख्या लपवली गेली. सहरसा जिल्ह्यात २२५ टक्के मृतांची संख्या वाढली आहे. बेगुसराय मध्ये ७ जुन पर्यंत कोरोनामुळे मरणा-यांची संख्या १३८ होती, ८ जुनला ४५४ करण्यात आली.
बिहार सरकारला हे ऑडिट यासाठी कराव लागल कारण न्यायालय सतत शपथपत्र मागत होते. राज्याचे मुख्य सचिव आपल्या अहवालात न्यायालयाला सांगतात की, बक्सर मध्ये १ मार्च ते १५ मार्च दरम्यान केवळ १५ मृत्यू झाले. पटना शहराचे कमीश्नर आपल्या अहवालात सांगतात की, याच कालवधीत बक्सरच्या एका स्मशानभूमीत ७८९ मृतदेह जाळले गेले. दोन शपथपत्रातील या तफावतीमुळे बिहार सरकारचा खोटेपणा विना मेहनत समोर आला. जर न्यायालयाने याबाबत सक्रीयता दाखवली नसती तर आपल्यालाही हे सत्य कळाले नसते.
याच हिशोबाने आपण जर विचार केला तर देशाच्या स्तरावर काय अवस्था असेल ? आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवर या तारखेपर्यंत कोरोनामुळे मरणा-यांची एकूण संख्या ३,५९,६७६ दाखवण्यात आली आहे. जर आपण देशाच्या या आकडेवारीत बिहारच्या नविन आकडेवारीनुसार ७२ टक्के वाढवले तर भारतात कोरोनामुळे मरणा-यांची संख्या ६,१८,६४२ होते. कोरोनामुळे भारतातील किती लोकांचा मृत्यू झाला याची खरी संख्या भारतातील लोकांनाच माहित नाही. यापेक्षा मोठा अपमान काय असु शकतो की लोक मेलेत हे माहित आहे मात्र किती लोक मेले याची खरी संख्याच माहित नाही. गावोगाव याच ऑडिट झाल पाहिजे. एक टिम यासाठी बनवली पाहिजे. घरोघरी सर्व्हे झाला पाहिजे. हे सुद्धा लिहिल पाहिजे की, मृत्यू रूग्णालयात नेताना झाला, रूग्णालयात पोहचल्यानंतर बाहेरच झाला की रूग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर घरी झाला. गावात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची खरी आकडेवारी कळाली पाहिजे. जर गावातील लोकांनी अस केल नाही तर जर उद्या शासनाने नुकसान भरपाई देवु केली तर ती मोजक्याच लोकांना मिळेल, बाकी लोक आयुष्यभर न्यायालयाच्या चकरा मारत राहतील. नुकसान भरपाई वरून राजकारण होईल. नुकसान भरपाई पेक्षा नेमके खरे मृत्यू किती झाले हे सत्य समजणे आवश्यक आहे.
हा प्रश्न परत-परत विचारावा लागेल की, भारत सरकार कोरोना मृत्यूंची खरी संख्या केंव्हा सांगेन ? याच पारदर्शक ऑडिट केंव्हा होईल? पेरू सारख्या देशाने जनतेच्या प्रश्नावर मरणा-यांच्या संख्येचा तपास केला आणि ही संख्या दुप्पट केली. आपल सरकार मात्र याला किती दिवस बगल देणार आहे ? आपल्या डोळ्यांसमोर मृतदेह नदीत वाहत राहिले. सरकारच सत्य समोर आणण्यासाठी मृतदेहांना बाहेर यायचच होत. मात्र परंपरेच्या नावावर सरकार स्वत:ला वाचवत होती. खरी संख्या लपवत होती. त्या अडीच महिन्यातील सत्य समोर आणण्यासाठी पत्रकारांना नदीत वाहणारे मृतदेह मोजावे लागले, स्मशानभूमीत जावुन मृतदेह मोजावे लागले. सरकारला मात्र काहीच फरक पडला नाही.
आपण स्वत:लाच विचारा की आपण मृतांच्या या आकडेवारीवर विश्वास ठेवता की त्या आकडेवारीवर जी सरकार रोज गंभीरतेने जाहिर करते. कमीत-कमी सरकारने स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करणा-यांची एक बैठक बोलावली पाहिजे. त्यांच्या डोळ्यात-डोळा घालुन सांगाव की, त्यांची आकडेवारी खरी आहे, स्मशानभूमीची आकडेवारी खोटी आहे. दवाखाने सुद्धा आता कोरोना मृत्यू मागील तारखेत दाखवत आहेत. कर्नाटक सरकार सुद्धा मरणा-यांच्या संख्येत ४००० जोडणार आहे. यांना सुद्धा मागील तारखांमधील सांगितल जात आहे. आपण यांना लपवलेले मृत्यू म्हणू शकत नाही का ? मृत्यू हे अंतिम सत्य आहे व या अंतिम सत्यालाच दवाखाने व सरकारं सहज लपवत आहेत. यावर विचार करणे गरजेचे आहे. जर अकल्पनीय आणि अभूतपूर्व काही असेल तर आपल्याच नागरिकांची मृत्यूंची संख्या लपविणं. कोरोना बळींची खरी संख्या समोर आली पाहिजे.

सुरेश मंत्री, अंबाजोगाई .
संपर्क- ९४०३६५०७२२

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!