
अंबाजोगाई /प्रतिनिधि
पाणी पुरवठ्याची पाईप लाईन टाकण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतातून चर खोदल्याने शेतातील कामे करणे अवघड जात असल्याची खंत धावडी येथील केंद्रेवाडी शिवारात (सर्वे क्रं 78 ) शेती असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्वरीत पाईप लाईन टाकून खोदलेला चर बुजून घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तालुक्यातील केंद्रेवाडी गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी धावडी येथील लांडगदऱ्याच्या तलावाच्या जवळ असलेल्या विहीरीतून पाणी पुरवठा केला जातो. जूनी झालेली पाईप लाईन खराब झाल्याने ती नवीन टाकण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने चर खोदण्यात आला आहे. हा चर सर्वे क्रं. 78 मध्ये असलेल्या काही शेतकऱ्यांच्या शेतातून विना परवाना खोदण्यात आला आहे. खोदतांना काही शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान ही झाले आहे. हा चर खोदून दहा दिवस झाले तरी नवीन पाईप लाईन टाकून हा बुजण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील कामे करण्यासाठी अडचणी येत आहेत. पावसाला सुरुवात झाली असून पेरणीचे कामे लवकरच सुरु होऊ शकतात यामुळे खोदलेला चरात लवकरात लवकर पाईप लाईन टाकून तो बुजून घ्यावा अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान दर पाच वर्षाला नवीन पाईप लाईन टाकली जाते असे गावकऱ्यांचे म्हणने आहे.