अर्धवट पुलाच्या कामामुळे अपघात

केज/प्रतिनिधी:
केज कळंब रस्त्यावर साळेगाव जवळील पुलाच्या अर्धवट व बंद पडलेल्या कामामुळे तसेच पुरेशी खबरदारी न घेतल्याने अपघात झाला असून त्यात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे.
केज कळंब दरम्यान साळेगाव येथील पुलाचे काम निकृष्ट व जम्पिंग स्वरुपाचे झाल्यामुळे पुलावरील रस्ता उखडून त्यावर खड्डे पडले होते. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा रस्ता खोदून ठेवला असून त्यावर लोखंडी सळाया अंथरून ठेवल्या आहेत. तर काम सुरू असल्याचे सूचना, दिशादर्शक फलक किंवा पुरेश्या प्रमाणात सुरक्षेची उपाययोजना न केल्यामुळे दि. 24 जून गुरुवार रोजी रात्री 10 च्या दरम्यान केज कडून मोटार सायकल क्र. (एमएच-22/डब्ल्यू-4944) वरुन येणारे पंडित राठोड (रा. सोनपेठ जि. परभणी) हे सरळ त्या लोखंडी सळ्यावर धडकले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाचस मार लागला. दरम्यान या रस्त्याने येत असलेल्या पोलीसांच्या गस्ती पथकास अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ 108 च्या रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिका चालक मकरंद घुले यांनी तात्काळ अपघातातील जखमीस केज येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. उपजिल्हा रुग्णालतात वैद्यकीय अधिकारी डॉ. भिसे यांनी जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई ला पाठवले.