प्रत्येक व्यक्तीने झाडे जगवावेत- पोलीस अधीक्षक आर. राजा

बीड/प्रतिनिधी:
भविष्यात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. आज लावलेली झाडेच उद्या आपल्याला प्राणवायू देतील, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी समतादूत वृक्षारोपण पंधरवडा कार्यक्रमात बोलतांना केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.समतादूत प्रकल्पामार्फत कोविड नियमांचे पालन करत महाराष्ट्रात वृक्षारोपण पंधरवडा राबवली जात आहेत. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बार्टीच्या वतीने ५ ते २० जून या कालाधीमध्ये वृक्षारोपण ही मोहिम पार पडत असून याच अनुषंंगाने बीड येथे एसपी ऑफिस परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सध्याच्या काळात पर्यावरणाची झालेली हानी भरून काढण्यासाठी व ऑक्सिजन वायूचे महत्त्व लक्षात घेता हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे पोलीस अधिक्षक आर. राजा यांनी सांगितले. तसेच बार्टीच्या या कार्यास शुभेच्छाही दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हजर होते. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समतादूत डी.एन.मात्रे, समतादूत गव्हाणे एन.आर व आखेब सय्यद यांनी परिश्रम घेतले. बीड येथे एसपी ए. राजा यांच्या उपस्थितीत एसपी कार्यालय आवारात वृक्षारोपण केले. याप्रसंगी डी. एन. मात्रे, एन. आर. गव्हाणे अादी.