
अंबाजोगाई: यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीचे पीक घेतले आहे मात्र लाईट सुरळीत नसल्याने शेतकऱ्यांनी घेतलेलं पीक पाण्यावाचून सुकू लागल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट महावितरण कार्यालयाच्या अभियंत्यांना घेराव घातल्याची घटना सोमवारी (दि. 31) घडली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीचे पीक घेतले आहे. यात हरभरा, ज्वारी, गहू यासह अन्य पीक घेतले आहे मात्र पाणी असून देखील लाईट सुरळीत नसल्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक सुकू लागले आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या अभियंता यांना ऑफिसवर येऊन जाब विचारला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महावितरणचे कर्मचारी पैशाची मागणी करीत असल्याचा आरोप देखील केला आहे. धावडी, केंद्रेवाडी, डोंगरपिंपळ, सोनावळाआणि भावठाण येथील दोनशे हुन अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी परिस्थिती पाहता महावितरणचे अभियंता जितेंद्र वाघमारे यांनी लागलीच कर्मचाऱ्यांना तोंडी आदेश देऊन लाईट सुरळीत करण्याचा सूचना दिल्या. तर यावेळी कार्यकर्त्यांनी अभियंता यांना निवेदन दिले आहे. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे,पंचायत समिती सदस्य सतीश केंद्रे, सरपंच पती बाळासाहेब केंद्रे, शंकर उबाळे, दिपक शिंदे, काशीनाथ घुले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.