विजेच्या तारा तुटून अंगावर पडल्याने, बाप-लेकाचा जागीच मृत्यू

उदगीर जि. लातुर:
वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसात शेतातून दुचाकीवरून घरी परत निघालेल्या बाप-लेकाचा अंगावर विजेच्या तारा तुटून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याच घटना तालुक्यातील बामणी येथे शनिवारी (दि. १२) घडली.
तालुक्यातील बामणी येथे दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दुपारी ३.२५ च्या सुमारास बामणी येथील शेतकरी नारायण यादवराव कोडमंगले (वय ५०) व त्यांचा मुलगा सिद्धरामेश्वर नारायण कोडमंगले (वय १६) हे दोघे त्यांची दुचाकी (क्र. एम. एच. २४ /टी. २२६) वरून शेतातून घराकडे निघाले होते. ते रस्त्याने बामणी शिवारातील पाझर तलावाच्या सांडव्यामध्ये आले असता अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी विजेच्या खांबावरील तारा तुटून त्यांच्या दुचाकी व अंगावर पडल्याने विजेचा शॉक लागून बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल बामणी गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अनिल गंगाधर कोडमंगले यांनी देवणी पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यू क्रमांक ७१ / २१ कलम १७४ सीआरपीसी प्रमाणे नोंद घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस जमादार उस्तूर्गे हे करीत आहेत.