अंबाजोगाई

अशोकराव देशमुखांनी जनतेच्या विधानसभेतच राहाणे पसंत केले : प्रा. सोमनाथ रोडे

अशोकराव देशमुखांचा अमृतमहोत्सवी सत्कार

अंबाजोगाई: राजकारण व समाजकारणात वावरताना अशोकराव देशमुखांनी आमदारकीची खंत कधीही बाळगली नाही. जनतेच्या विधानसभेतच राहण्याचे त्यांनी पसंत केले. असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत सोमनाथ रोडे यांनी रविवारी (दि.२७) येथे केले.
सहकारमहर्षी अशोकराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त सोहळ्यात प्रा.रोडे बोलत होते. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, पद्मश्री तात्याराव लहाने , सत्कारमूर्ती अशोकराव देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी व्दारकाबाई देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

या प्रसंगी बोलताना प्रा. रोडे म्हणाले, की अशोकराव हे चारित्र्य असलेला माणुस आहे. हा सत्कार त्यांच्या साधेपणाचा व मातीशी इमान राखणाऱ्या व्यक्तिचा आहे. राजकारणासह सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य सर्वांना माहित आहे. परंतू सध्या सहकाराची अवस्था न सांगण्यासारखी आहे. सहकारी साखर कारखानदारीचे स्वरूप सहकारांकडून स्वाहाकाराकडे गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. देशाच्या लोकशाहीत महत्वाचे दोन प्रश्न भेडसावत आहेत. त्यात बेरोजगारी व विषमता हे दोन प्रश्न मोठे आहेत. विषमतेची दरी कमी होण्याऐवजी ती वाढतच आहे. ही विषमता संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न न झाल्यास देशाच्या लोकशाहीला धोका असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. कोळसे पाटील म्हणाले, की देशाचा खरा इतिहास लपवून ठेवला जातो. ही मोठी शोकांतिका आहे. ज्याच्याकडे जे कमी आहे, ते त्याला देणे, यासाठी सहकार चळवळ आणली आहे. इथे तात्विक विरोध केला की ते इडी लावला जाते. सध्याच्या प्रश्नावर बोलताना, सार्वजनीक उद्योगातील नोकऱ्या गेल्या आहेत. हे उद्योग कवडीमोल भावात विकल्या. सहकारी साखर कारखाने आता खासगी झाले. असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले.
डाॅ. तात्याराव लहाने यांनी आपल्या प्रास्ताविकात अशोकराव देशमुखांच्या विविध आठवणी सांगितल्या. सर्वांनी एकत्र येवून त्यांचा हा अमृत महोत्सवी सन्मान केल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.
आपल्या सत्काराला उत्तर देताना अशोकराव देशमुख यांना जुन्या चळवळीतील आठवणी सांगताना गहिवरून आले. त्यांच्या सोबत जे मित्र होते, त्यांनाही ते विसरले नाहीत. मी कुठला लोकनेता व सहकारमहर्षी नाही, मला शेवटपर्यंत कार्यकर्ताच राहू द्या अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सत्काराला मोठी गर्दी

यावेळी अशोकराव देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मुकुंदराज सभागृह गच्च भरले होते. उपस्थितांची भाषणे झाल्यानंतर अशोकराव देशमुखांचा आदरपूर्वक सत्कार करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. विविध गावचे सरपंच, सेवा संस्थेचे अध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या माकेगावचे सर्व ग्रामस्थ, नातेवाईक आदींनी त्यांचा स्नेहपूर्ण सत्कार केला. यावेळी सन्मानपत्राचे वाचन अभिजीत जोंधळे यांनी केले. सूत्रसंचालन आनंद टाकळकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी अशोकराव देशमुख अमृत महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!