दगडवाडी येथे शेतीच्या वादातून बेदम हाणामारी

अंबाजोगाई/प्रतिनिधी
बांधावर कुपाटी टाकण्यासह बैल शेतात आल्याच्या कारणावरुन तालुक्यातील दगडवाडीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (दि.१४) दुपारी घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन १५ जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
रामचंद्र हरिभाऊ सुरनर यांच्या फिर्यादीनुसार, बांधावर कुपाटी टाकण्याच्या कारणावरुन त्यांना काठी व दगडाने मारहाण करत जखमी केले. सुभान सुरनर, रंगनाथ सुरनर, लहूदास सुरनर, लंकाबाई सुरनर, पुष्पा सुरनर, मनीषा सुरनर, नामदेव पुंडगर, संपत शितळकर यांच्यावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान,पुष्पा सुरनर यांनीही फिर्याद दिली. शेतात पेरणी करत असताना ‘तुमचे बैल आमच्या शेतात का येऊ देतात’ या कारणावरुन काठी, कोयता, कुहाडीने मारहाण करत जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. लक्ष्मी सुरनर, सहदेव सुरनर, वासुदेव सुरनर, रामचंद्र सुरनर, विष्णू सुरनर, कृष्णा सुरनर, खंडू सुरनर यांच्यावर गुन्हा नोंद झाला.