पाण्यावरून दाेन कुटुंबांत हाणामारी

बीड/प्रतिनिधी:
शौचालयाचे पाणी घरासमोर फेकण्याच्या ( Fight for throwing toilet water) कारणावरून तालुक्यातील पहाडीपारगाव येथे दोन कुटुंबांत हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२५) घडली. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून १४ जणांवर धारूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दीपक अंडील यांच्या फिर्यादीनुसार, ते व मोहिते यांचे शेजारी घर आहे. घरासमोर घाण व शौचालयाचे पाणी फेकल्याच्या कारणावरून अंडील कुटुंबीयांना शिवीगाळ करत चापटबुक्क्यासह काठी व दगडाने मारहाण केली. याप्रकरणी उत्तम मोहिते, करण मोहिते, अर्जुन मोहिते, बंडीबाई मोहिते यांच्यावर गुन्हा नोंद झाला. दरम्यान, अर्जुन मोहिते यांनीही फिर्याद दिली. सांडपाणी व घराची शौचालयाचे पाणी आमच्या घराकडे का सोडता? अशी विचारणा केली असता आरोपींनी डोक्यात गज व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करत इतरांनी दगडफेक केली. यात अर्जुन यांचे वडील उत्तम मोहिते यांना दुखापत झाली. यावरून दिनकर अंडील, दीपक अंडील, बाजीराव अंडील, रुक्मानंद अंडील, परीक्षित अंडील, सूरज अंडील, सुमित्रा अंडील, मीरा अंडील व स्वप्नाली अंडील यांच्यावर गुन्हा नोंद झाला. या दोन्ही प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक पालवे करत आहेत.