लाच मागणाऱ्या रोखपाला वर गुन्हा दाखल

शिरूर: लेखापरीक्षण शुल्काच्या धनादेशावर सही करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच मागणाऱ्या रोखपालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे बीड शाखेने शनिवारी ( दि. 19) अटक केली. शिरूर कासार पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुंदर भागवतराव बांगर ( रा. कालिका नगर, बीड) हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खालापुरी ( ता. शिरूर ) शाखेत रोखपाल आहे. तसेच तो सध्या शिरूर तालुक्यातील जांब येथील सेवा सहकारी संस्थेवर प्रशासक आहे. लेखापरीक्षण केलेल्या संस्थेच्या लेखापरीक्षण शुल्काच्या धनादेशावर सही करण्यासाठी सुंदर बांगर यांनी पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत बीड एसीबी कडे तक्रार प्राप्त झाली होती. या पथकाने तक्रारीचे पडताळणी केली असता बांगर यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सुंदर बांगर याच्यावरच शिरूर कासार पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर अधीक्षक मारुती पंडित, प्रभारी अप्पर अधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रवींद्र परदेशी, अंमलदार श्रीराम गिराम, भरत गारदे यांनी पार पाडली.