केजक्राईम डायरी

केजमध्ये भामट्यांची भामटेगिरी फसली !

तोतया अन्न भेसळ निरीक्षक केज पोलिसांच्या ताब्यात

गौतम बचुटे/केज :-  केज येथे दोघा तोतयानी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी आहोत असे सांगून किराणा दुकान, रसवंती आणि टपरी चालकाला धमकविणारे दोन भामटे केज पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

या बाबतची माहिती अशी की, दि. २७ फेब्रुवारी रोजी केज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांना एका फोनवरून माहिती मिळाली की, केज आणि मस्साजोग येथे दोन अनोळखी व्यक्ती हे आले असून ते अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत आहेत. त्यांना ओळखपत्र दाखवा अशी मागणी केल्या नंतर त्यांनी पळ काढला. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब यांना मिळाली परंतु पोलीस निरीक्षक दादासाहेब सिद्धे हे बाहेरगावी असल्याने त्यांनी ही माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि ठाणे अमंलदार धनपाल लोखंडे यांना दिली. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांनी ही माहिती तात्काळ सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना दिली. त्यांनी तात्काळ सत्यता पडताळून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या नुसार सहाय्यक फौजदार महादेव गुजर, पोलीस नाईक उमेश आघाव व सोनवणे यांनी हालचाल करून ‘त्या’ अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालय केजच्या परिसरातून पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना पोलीस स्टेशन केज येथे आणून त्यांचा योग्य पद्धतीने पाहुणचार करून चौकशी केली असता त्यानी सांगितले की, दोघे दोघे नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील हिंगणी ता. जि. बीड येथील रहिवाशी असून त्यांची नावे हिरामण उर्फ रमेश पांडुरंग नागरगोजे वय २६ वर्ष आणि ज्ञानेश्वर आत्माराम आंधळे वय २७ वर्ष अशी आहेत. आशा प्रकारे त्यांनी तोतयेगिरी करून अनेकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकांनी सावधानता बाळगावी 

नागरिकांनी अशा प्रकारे कोणी तोतयेगिरी करून व अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करीत असतील त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. म्हणजे त्यांचा बंदोबस्त करता येईल व फसवणूक टाळता येईल.

– पंकज कुमावत (सहा. पोलीस अधीक्षक, केज)

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!