रूग्णवाहिका,ऑक्सिजन वाहनांसाठी मोफत डिझेलची साेय

अंबाजोगाई/प्रतिनिधी:
कोरोना रूग्ण घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी रिलायन्स बी.पी मोबिलिटी कंपनीच्या वतीने दररोज ५० लीटर डिझेल मोफत देण्यात येणार आहे अशी माहिती राज एजन्सीज रिलायन्स पेट्रोल पंपाच्या वतीने देण्यात आली आहे.या सुविधेचा प्रारंभ शुक्रवार,दिनांक २५ जून रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
अंबाजोगाई शहरातील राज एजन्सीज रिलायन्स पेट्रोल पंप येथे कोरोना रूग्ण घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहिका,ऑक्सिजन वाहतूक करणा-या वाहनांसाठी रिलायन्स बी.पी मोबिलिटी कंपनीच्या वतीने मोफत डिझेल,पेट्रोल सुविधा दिली जात आहे.या सुविधेनुसार दररोज ५० लीटर डिझेल, पेट्रोल मोफत देण्यात येणार आहे.या उपक्रमाची सुरूवात अंबाजोगाईतील राज एजन्सीज रिलायन्स पेट्रोल पंपावर शुक्रवार रोजी करण्यात आला.याबाबत माहिती देताना राजकिशोर मोदी म्हणाले की,रिलायन्सच्या सर्व पेट्रोल पंपावर हा उपक्रम राबविण्यात येत असून जिल्हा प्रशासन अथवा जिल्हाआरोग्य अधिकारी कार्यालयाचे पत्र घेऊन येणाऱ्या नोंदणीकृत खासगी अथवा सरकारी रूग्णवाहिका व ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना याचा लाभ घेता येणार आहे,अशी माहिती संचालक मोदी यांनी दिली.यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकिय ग्रामीण रूग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजीराव सुक्रे,डॉ.नागेश अब्दागिरे,डॉ.धपाटे,अभ्यागत मंडळाचे सदस्य कचरूलाल सारडा,खालेद चाऊस,काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने,नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक वाजेद खतीब,नगरसेवक सुनिल व्यवहारे, नगरसेवक धम्मपाल सरवदे,माजी नगरसेवक सुनिल वाघाळकर,माजी नगरसेवक गणेश मसने,माजी नगरसेवक सज्जन गाठाळ,अशोक देवकर,भारत जोगदंड,सहशिक्षक विजय रापतवार,जावेद गवळी,चंद्रकांत महामुनी,सचिन जाधव,प्रताप देवकर,अजीम जरगर,अमोल मिसाळ,महेश वेदपाठक आदींसह राज एजन्सीज रिलायन्स पेट्रोल पंपाचे व्यवस्थापक सुजीत परदेशी, सुपरवायझर महेश प्रभाळे,आबासाहेब सोळंके,महेन्द्र शेप यांची उपस्थिती होती.
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात रिलायन्स समूहाचा मदतीसाठी पुढाकार
देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे.मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दर दिवशी चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली होती.आता हाच आकडा ३ लाखांच्या खाली आला आहे.मात्र दररोज ४ हजारहून अधिक रूग्णांचा मृत्यू होत असल्याने परिस्थिती गंभीर आहे.या स्थितीत उद्योगपती मुकेशजी अंबानी हे पुढे आले आहेत.कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी रिलायन्स समूहानं आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.आता रिलायन्स समूह त्यांच्या मालकीच्या सर्व पेट्रोल पंपांवर रूग्णवाहिकांना ५० लीटर डिझेल मोफत देणार आहे.त्यामुळे रिलायन्सच्या पेट्रोल पंपांवर रूग्णवाहिकांना दररोज ५० लीटर डिझेल किंवा पेट्रोल मोफत मिळेल.मात्र यासाठी एक अट आहे.मोफत डिझेल घेणारी रूग्णवाहिका सरकारी असायला हवी.देशभरात रिलायन्सचे जवळपास १५०० पेट्रोल पंप आहेत.या सर्व पेट्रोल पंपासह अंबाजोगाई शहरात ही सुविधा उपलब्ध असेल.रिलायन्सच्या पेट्रोल पंपवर सरकारी रूग्णवाहिकांना मोफत डिझेल मिळेल.गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.त्यामुळे कोरोना संकटात सुरू असलेल्या मदतकार्यात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकीतून रिलायन्सने हा निर्णय घेतला आहे.’कोरोना संकटाचा सामना करताना केंद्र व राज्य सरकार महत्त्वाची पावले उचलत आहे.या महामारीशी दोन हात करण्यासाठी रूग्णवाहिकांना आम्ही डिझेल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे सरकारी खर्च वाचेल.पैशांची बचत होईल,’ असे राज एजन्सीज रिलायन्स पेट्रोल पंपाचे संचालक संकेत राजकिशोर मोदी यांनी म्हटले आहे.