मयत सफाई कामगार सुदामती वाघमारे यांना न्याय मिळेना !

अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
येथील नगरपरिषदेच्या कार्यालयात सौ. सुदामती भगवान वाघमारे या सफाई कामगार म्हणून कार्यरत होत्या. कोवीड – 19 च्या काळात काम करताना त्यांना कोरोना होऊन त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू होऊनही त्यांच्या कुटुंबास शासनाकडून मदत मिळाली नाही. नगरपालिकेने त्यांच्या कुटुंबास तात्काळ न्याय मिळवून द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सोमवारी ( दि.14) मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. या स्वरूपाचे निवेदन येथील उपजिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना दिले आहे.
येथील नगरपालिकेच्या सफाई विभागात सौ. सुदामती भगवान वाघमारे या सफाई कामगार म्हणून काम करीत होत्या. अंबाजोगाई शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. या महामारी च्या कालावधीत सौ. वाघमारे यांनी आपले कर्तव्य निष्ठेने बजावले होते. परंतु नगरपालिकेने सफाईचे काम करण्यासाठी कामगारांना आवश्यक सुविधा पुरविल्या नव्हत्या. याबाबत वारंवार विनंती करूनही प्रशासनाने सुविधा पुरवल्या नसल्याने सफाई कामगार सौ. सुदामती वाघमारे यांना कोरोना आजाराची लागण झाली. उपचारासाठी त्यांना येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान 4 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूस सर्वस्वी नगरपरिषद अंबाजोगाईचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, स्वच्छता विभाग प्रमुख व सफाई कंत्राटदार कंपनी जबाबदार आहे. यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मयत सुदामती वाघमारे यांच्या कुटुंबास शासकीय परिपत्रकानुसार प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना विमा योजना अंतर्गत 50 लाख रुपये मिळवून देवून त्यांच्या कुटुंबास न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका प्रवक्ता गोविंद मस्के, प्रकाश वेदपाठक सुशांत धावारे, अमोल वाघमारे बालासाहेब मस्के, सचिन वाघमारे
यांच्या स्वाक्षर्या आहेत.
सफाई कंत्राटदार कंपनीने हात झटकले.
सुदामती वाघमारे यांच्या नातेवाईकांनी सफाई कंत्राटदार कंपनी यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे. या पत्रात नमूद केले आहे की,
“महिला सफाई कामगारांचे टेंडर आमच्याकडे नाही व त्याचे बिल पण आम्हाला मिळत नाही. त्यामुळे आमच्या कडे सौ. सुदामती वाघमारे या व इतर कोणत्याही महिला कामगार आमच्या टेंडर मध्ये किंवा आमच्याकडे कार्यरत नाहीत. याआधीही ही वेळोवेळी पत्रव्यवहार करून आपल्या कार्यालयास कळविण्यात आले आहे. कंपनीकडे एकही महिला कामगार नसल्याने त्यांनी याबाबतची जबाबदारी झटकून नगरपालिकेवर टाकली आहे.”
कार्यालया पुढे उपोषण गरपालिकेने सफाईचे काम करण्यासाठी सफाई कामगार सौ. सुनंदा वाघमारे यांना पुरेशा सुविधा पुरविल्या नसल्याने त्यांना कोरोना झाला व त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे नगरपालिका व सफाई कंत्राटदार कंपनी यांनी मयत वाघमारे यांच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळवून द्यावी. अन्यथा पुढील काही दिवसात न्यायालयात न्याय मागण्यात येईल व नगरपालिका कार्यालया पुढे उपोषण करण्यात येईल. - कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई.