भांडणात मध्यस्थी करणाऱ्याची सोन्याची साखळी काढून घेतली

केज/प्रतिनिधी:
भांडण सोडवण्यास आलेल्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास धक्काबुक्की करत त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी काढून घेतली. ही घटना तालुक्यातील तांबवा शिवारात घडली. याप्रकरणी केज पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तांबवा येथील सेवानिवृत्त कर्मचारी गणपती काशीनाथ परळकर (५५) हे अंबाजोगाई शहरातील जिजाऊ नगरमध्ये सध्या वास्तव्यास आहेत. १५ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास परळकर हे पत्नीसह तांबवा शिवारातील शेतात आले होते. यावेळी सुशांत माणिक चाटे, राजेश माणिक चाटे (दोघे रा. तांबवा) यांचे दुसऱ्याशी भांडण लागले होते. हे भांडण सोडवण्यास गणपती परळकर गेले असता त्यांना दोघांनी संगनमत करून धक्काबुक्की केली. राजेश चाटेने परळकर यांच्या गळ्यातील ९९ हजार ८८५ रुपये किमतीची २ तोळ्याची सोन्याची चैन काढून घेतली. तर परळकर दांपत्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद गणपती परळकरांनी दिली. यावरून सुशांत चाटे, राजेश चाटे यांच्यावर केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक धनपाल लोखंडे तपास करत आहेत.