लेख

गुंफण नात्यांची

मानवाच्या जन्माबरोबर तो अनेक नात्यांच्या बंधनात बांधला जातो. यापैकी काही नाती ही रक्ताची असतात. आई-वडिल, भाऊ-बहिण, आजी-आजोबा अशी अनेक नाती जन्माबरोबर आपोआप निर्माण होतात. या नात्यांमुळे कुटुंबाची निर्मिती होते. अनेक कुटुंब मिळून समाजाची निर्मिती होते आणि अनेक समाजांच्या सुमधुर नात्यांच्या परंपरेने देश बनतो. प्रत्येक नात्यांचा आधार ही संवेदना असते. संवेदना अर्थात सम आणि वेदना म्हणजे सुख आणि दु:ख मिळून तयार झालेले रूप जे आयुष्यातील ऊन –सावलीच्या भावनांशी ओळख करून देत. रक्तांची नाती तर जन्म घेताच मनुष्यासोबत स्वत:च जुडतात परंतू काही नाती काळासोबत आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देतात. दोस्त असेल अथवा आपला शेजारी,वर्गमित्र असेल अथवा आपला सहकारी किंवा गुरू-शिष्याचे नाते. या नात्यांच्या सागरात सर्वजण आपसातील प्रेम आणि आणि भावनांच्या लाटेत डुंबत असतात. आपलेपणाची हीच भावना मनुष्याच्या जीवनाला सबळ आणि सार्थक बनविते अन्यथा मनुष्याला एकाकी जीवन जगणे कठिण आहे. सुमधूर नातीच मानवात मानवतेची निर्मिती करतात.

मानवी जगात एक दुस-यांसोबत जुडले जाण्याची भावनेची जाणिव यालाच नाती म्हणतात, फक्त नात्यांची नावे ही वेगवेगळी असतात. काळासोबत एका वृक्षासारख नात्यांनाही संयम,सहिष्णुता आणि आत्मियता रूपी खताची आवश्यकता असते. मात्र आजच्या या आधुनिक आणि वेगाने धावत्या जीवन शैलीत बहुमूल्य अशा नाती कुठेतरी मागे पडत चालली आहेत. अनेक लोक फक्त औपचारिकता म्हणून किंवा फक्त आपला स्वार्थ साधण्यासाठी नात्यांचा वापर करित आहेत. अशा लोकांमुळे नात्यांची परिभाषाच बदललिय जणू. अशा लोकांसाठी तर न बाप बडा न भैया,सबसे बडा रुपया अशी विचारसरणी असते. याला आपण पावसाळ्यातील बेंडकाची उपमा दिली तरी चालेल. अशी लोक आपल्यासोबत तोपर्यंतच नातं ठेवतात जोपर्यंत आपल्याकडे काम आहे किंवा पैसा आहे. जोपर्यंत नाते व्यक्तीगत स्वार्थ पूर्ण करतेय तोपर्यंच जपायच आणि स्वार्थ पूर्ण होताच नातंच विसरून जायच. अशा लोकांच्या शब्दकोषात भावना आणि संवेदना सारखे शब्दच नसतात. काही लोक अशा प्रकारच्या नात्यांसोबत अजाणतेपणी जोडले जातात आणि ही नाती तुटली की ती स्वत:चा मानसिक क्लेष करून घेतात. अनेक लोक या आघाताला आपल्या मनात एवढी जागा देतात जस की तो काही बहुमूल्य पदार्थ होता आणि हरवला.ज्या नात्यात काही तथ्यच नव्हत त्याच्या तुटण्याच दु;ख मानून काय उपयोग?मनोवैज्ञानिक मैथ्यु सेक्सटॉन म्हणतात की, मनुष्याची ही प्रवृती आहे की तो नात्यातील दुरावा आणि पिडेला आपल्या मनात ठेवतो आणि तिचे पोषण ही करतो. यामुळे मानसिक आघात होवून मनुष्याच्या स्वास्थ्यावरही वाईट परिणाम होतो. अशा नकारात्मक आठवणींनी तणाव निर्माण होतो. या तणावामुळे शरीरात ‘कार्टीसोल’ नावाचे हार्मोन स्त्रवायला सुरुवात होते, जो आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी करतो. याचाच परिणाम म्हणून व्यक्तीला अनेक प्रकारचे आजार जडतात. खास करून तरुण वर्गाने अशा प्रकारच्या नात्यांना वेळीच ओळखून दूर राहिले पाहिजे ज्याचा पाया केवळ स्वार्थ भावना आहे, कारण अशी नाती केवळ दु:ख आणि तणावाच्या बरोबर वैफल्य निर्माण करतात.

स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे की, जीवनात जास्त नाती असण हे आवश्यक नाही, पण जी नाती आहेत त्यात जीवन असणे म्हणजेच जीवंतपणा असणे गरजेचे आहे. नात्यांच्या बाबतीत बोलताना पति-पत्नीच्या नात्याचा उल्लेख केल्याशिवाय जमणार नाही कारण हे नात तर संपूर्ण कुटुंबातील गोडव्याचा आधार असत. या नात्यातील गोडवा आणि दुरावा दोन्हींचा मुलांवर परिणाम होतो. अनेक वेळा छोटया-छोटया गैरसमजांमुळे या नात्यात कटुता निर्माण होते. खरं तर पति-पत्नी मधिल नात हे एका नाजुक पक्षासारख अति संवेदनशिल असत, एवढ की, ‘धरल तर चावतय आणि सोडल तर पळतय’. पण या नात्यात प्रेम आणि विश्वास असेल तर हे नात जन्मभर टिकत.
अनेक वेळा आपसातील नाती थोडयाशा बेबनावामुळे आणि खोटया अहंकारामुळे क्रोधाच्या अग्नीकुंडात स्वाहा: होतात. नात्यात आपल्याला अस वाटत की, दूस-यांनी आपल्याला समजूण घ्याव, आपण जस त्यांच्याशी वागतो तस त्यांनी आपल्याशी वागाव पण अस होईलच अस नाही. जर आपल्याला अस वाटत असेल की लोक आपल्याला समजून घेतील आणि आपल्या मतानूसार काम करतील तर हा आपला भ्रम आहे. नात्यातील जास्त अपेक्षेमुळे किंवा गैरसमजुतीमुळे आपल्यातील काही लोक आपल्या नातेवाईकांशी बोलणेच बंद करतात. मग या नात्यात असा दुरावा निर्माण होतो की आपल्या मनात असूनही पुन्हा यात जवळिकता निर्माण करता येत नाही. अशा वेळी पश्चतापाशिवाय दूसरे काही हाती येत नाही. म्हणून आपल्याला आपल्या विचारांचा कक्षा एवढया वाढवल्या पाहिजेत की आपण नात्यातील लोकांच्या वेडेपणालाही समजून घ्याल. आपल्या आसपास खूप चांगली माणस आहेत जे कधी-कधी काही क्षणांसाठी वेडयासारख वागतात. जर आपण त्यांना समजून घेतल नाही तर निश्चितच आपण त्यांना गमावून बसाल. आयुष्य हे नेहमी सरळ मार्गी नसत यात नात्यांमधून सुद्धा कटू अनुभव येतात. नात वैयक्तीक असेल अथवा व्यावसायिक,राजकिय वा अन्य प्रकारच आपल्याला या नात्यांशी जुळवून घेता आल पाहिजे, अन्यथा आपल नात यशस्वी होणार नाही. कुणी तरी म्हटले आहे की, जर तुम्हाला कुणासोबत आयुष्यभर नात टिकवायच आहे तर आपल्या मनात एक स्मशानभूमी बनवायला पाहिजे ज्यात समोरच्याच्या सर्व चूका गाडून टाकता येतील.

कोणतही नात आपसातील विश्वास आणि नि:स्वार्थ भावनेसोबत प्रेमाने यशस्वी होत असत. जर नात्यात आपसातील न मिटणारा बेबनाव असेल तर हे छोटस आयुष्यही खूप मोठ वाटायला लागत. मानवतेच नात जर आपसात असेल तरच समाज आणि देशात शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल. विश्वास आणि आपलेपणाच्या गोडव्याने आजही आपण नात्यांचे महत्व कायम राखू शकतो, नाहीतर गैरसमजुती आणि अविचारांमुळे आपण नात्यांतील गोडवी कायमची हरवून बसू. कुणी तरी म्हटल आहे,

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वळणे येतात,
प्रत्येक वळणावर अनोळखी नाती जुळतात !!
अनोळखी व्यक्ती आपल्या हक्काच्या होतात…
आयुष्यात येवून आयुष्यच बनून जातात….
ही नाती हसतात,खेळतात,भांडतात आणि रुसूनही
बसतात….
पण तरीही एकत्र येतात जश्या संगमावर नदया
मिळतात…
कितीही दूर असली तरी मनात आठवणी बनून
राहतात….

सुरेश मंत्री,अंबाजोगाई
संपर्क-९४०३६५०७२२

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!