रुग्णांसाठीचे एसी धूळ खात; ‘डीन’साठी ‘आयसीयू’तून वीज

मानवलोक संस्थेेने रुग्णांसाठी दिले होते १४ एसी
|अंबाजोगाई/प्रतिनिधी:
अति दक्षता विभागातील रुग्णांना गर्मीचा त्रास होऊ नये या उदात्त हेतूने ‘मानवलोक’ संस्थेने स्वाराती रुग्णालयाच्या ‘आयसीयू’साठी १४ एअर कंडिशनर यंत्रे फिटिंग करून दिली. मात्र, दोन महिने झाली, उन्हाळा संपून पावसाळा सुरु झाला तरी रुग्णालय प्रशासनाने विद्युत जोडणी न दिल्याने हि वातानुकूलित यंत्रे धूळखात पडून आहेत. मात्र, त्याचवेळी अधिष्ठातांच्या निवासस्थानाचा विद्युत पुरवठा क्षणभरही बंद पडू नये यासाठी अंदाजे २०० मीटरची लाईन ओढून चक्क ‘आयसीयू’च्या जनरेटरमधून विद्युत जोडणी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
कोरोना काळात अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाकडे आसपासचे तालुके आणि जिल्ह्यातून रुग्णांचा प्रचंड ओढा आहे. साहजिकच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत साहजिकच येथील अति दक्षता विभाग देखील रुग्णांनी खचाखच भरलेला असायचा. आयसीयू मधील रुग्णांना गर्मीचा कसलाही त्रास होऊ नये यासाठी एप्रिल महिन्यात ‘मानवलोक’ संस्थेने ‘आयसीयू’मध्ये १४ नवे कोरे एसी बसवून दिले. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून मानवलोकच्या कार्यकर्त्यांनी एसीची फिटिंग करून दिली. या सर्व एसीला फक्त विद्युत जोडणी देणे एवढेच काम रुग्णालयाने करायचे होते. मात्र, दोन महिने उलटले, उन्हाळा संपला पावसाळा सुरु झाला तरी अद्याप केवळ विद्युत जोडणी न दिल्याने हे एसी धूळखात पडून आहेत. कोरोनाची लाटही ओसरली, रुग्णसंख्याही कमी झाली. त्यामुळे या एसी देण्याचा काहीच उपयोग रुग्णांना झाला नाही. याबाबत मानवलोकने मागील महिन्यात रुग्णालयाला स्मरणपत्र देखील दिले, तरी देखील सर्व एसीला कनेक्शन देण्याचे अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. जर सेवाभावी संस्था लाखो रुपये खर्च करून रुग्णांच्या सोयीसाठी आवश्यक उपकरणे देत असतील, आणि रुग्णालय प्रशासनाला त्या मदतीचा सुयोग्य वापर करून घेता येत नसेल तर ‘स्वाराती रुग्णालयाची झोळी फाटकी’ असेच म्हणावे लागेल.
मात्र, त्याचवेळी अधिष्ठातांच्या निवासस्थानचे फॅन, एसी बंद पडू नयेत, तिथे अखंडित विद्युत पुरवठा व्हावा म्हणून चक्क ‘आयसीयू’च्या जनरेटरमधून त्यासाठी कनेक्शन देण्यात आले आहे. हजारो रुपये खर्च करून २०० मी. ची विद्युत केबल तातडीने टाकण्यात आली. वास्तविक निवासस्थानात ३-४ बॅटरी बॅकअपचे इन्व्हर्टर असताना जनरेटरमधून जोडणी देण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, एसी सारखी मोठी उपकरणे इन्व्हर्टरवर चालत नसावीत म्हणून ही जोडणी देण्यात आल्याची चर्चा आहे. एकीकडे आयसीयू मधील रुग्णांनी उन्हाळा एसी शिवाय काढला, मात्र आयसीयूच्या जनरेटरमधून कनेक्शन घेऊन अधिष्ठातांचा उन्हाळा सुसह्य करण्यात आल्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
नऊ एसीच्या जोडणीचे काम पूर्ण
मानवलोकने दिलेल्या ९ एसी जोडणीचे काम झालेे आहे. ऊर्वरित काम सुरू आहे. सा. बां. विभागाने विद्युत पुरवठा सुधारल्याशिवाय एसी सुरू करू नये, अन्यथा विरार सारखी घटना घडू शकते असे सांगितले आहे. तसेच, मला दोन वेळेस किमान ३-४ तास रात्री विना लाईट, फॅनचे काढावे लागले, त्यामुळे अधिष्ठाता निवासस्थानाला जनरेटरचा सप्लाय दिला आहे. त्याचा जनरेटरवर लोड येणार नाही’
. -डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती