बोधीघाट येथे घर फोडून भांडे चोरले

अंबाजोगाई: खिडकीच्या वर बसवलेल्या काचा फोडून घरामध्ये प्रवेश करीत घरातील पितळी भांडे व इतर साहित्य चोरून नेल्याची घटना शहरातील बोधीघाट परिसरात घडली याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
बोधीघाट येथील रहीवासी नितीन सूर्यकांत गरड हे आपल्या नोकरी निमित्त औरंगाबाद येथे राहतात. यामुळे त्यांचे बोधीघाट येथे असलेले घर बंद असते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या खिडकीच्या वर अर्धगोलाकार काच फोडून त्यात प्रवेश केला व घरातील भांडे चोरून नेले. यामध्ये एचपी कंपनीची गॅस टाकी, पाणी तापवण्याचा तांब्याचा बंब, तांब्याचा हंडा, पितळेची घागर, पितळेचे पातेले, वाट्या, ग्लास, काशाचे जेवणाचा थळा, हॅन्डलूमचे मोठे पातेले असा १४ हजार ९०० रुपयांचे भांडे चोरट्याने चोरून नेले. औरंगाबाद येथून घरी आल्यानंतर नितीन सूर्यकांत गरड यांनी दि. १० रोजी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.