पैशाचे आमिष दाखवून महिलेचा विनयभंग

केज/प्रतिनिधी:
‘तुझा पती गरीब आहे, तुला पैसे पुरवतो’ असे म्हणत एका २२ वर्षीय महिलेचा विनयभंग करीत पीडित महिलेस आणि तिच्या पतीस मारहाण केल्याची घटना केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी शिरूरघाटच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील पीडित २२ वर्षीय महिला व तिचा पती हे दोघे केज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात हॉटेलवर कामाला आहेत.
पीडित महिला ही २० जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हॉटेलवर काम करीत असताना आरोपी विक्रम सांगळे (रा. सांगळे वस्ती, शिरूरघाट, ता. केज) याने पीडित महिलेजवळ येऊन ‘तुझा नवरा गरीब आहे, मी तुला पैसे पुरवितो’ असे म्हणत पीडितेच्या हाताला धरून विनयभंग केला. पीडितेने आरडाओरडा केल्याने तिचा पती आला असता त्या दोघांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली.
जिवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला, अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून आरोपी विक्रम सांगळे याच्याविरुद्ध केज पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रुक्मिण पाचपिंडे या पुढील तपास करत आहेत.