यंदाचा स्नेहसंवर्धन पुरस्कार राजू जागींड यांना

अंबाजोगाई/ प्रतिनिधी:
आंतरभारती आंबाजोगाई द्वारा दर 15 ऑगस्ट रोजी दिला जाणारा स्नेहसंवर्धन पुरस्कार या वर्षी राजू जागींड यांना दिला जाणार आहे.
अन्य प्रांतातून येऊन आंबाजोगाईत स्थायिक झालेल्या व आपल्या कार्याने आंबाजोगाईच्या गौरवात भर घालणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. या पूर्वी प्राचार्य डॉ. बी आय खडकभावी (कर्नाटक), मनीष स्वीटचे शशिकांत रुपडा (गुजरात), प्राचार्य एम. बी. शेट्टी (कर्नाटक), मेवाडचे शंकर सिंग मेहता (राजस्थान), श्रीनिवास हेयर साळुंचे आनंदराव अंकाम (तेलंगाणा), उडपी हॉटेलच्या सुशीलाताई शेट्टी (कर्नाटक) व सिमेंट उद्योगातील सलीम भाई (बिहार) यांचा सत्कार करण्यात आला असून 2021 चा पुरस्कार राजस्थानचे राजू जागींड यांना दिला जाणार आहे.
अन्य प्रांतातून येऊन स्थायिक झालेल्यांचा असा सत्कार अन्य कोठेही होत नाही. साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब , डॉ अलका वालचाळे (स्थानिक अध्यक्ष) वैजनाथ शेंगुळे (सचिव) दत्ता वालेकर (उपाध्यक्ष), अनिकेत डिघोळकर (कार्यक्रम संयोजक) आदी अनेक जण हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड करीत आहेत.
कोण आहेत राजू जागींड
राजू भांवरलाल जागींड हे सुतार काम करतात. राजू-मुकेश या नावाने प्रसिद्ध असलेल्या दोन भावापैकी ते एक आहेत. 1991 साली ते आपल्या काकांच्या सोबत आंबाजोगाईला आले. आधुनिक सुतार काम करीत ते आंबाजोगाईत स्थायिक झाले. त्यांचे मूळ गाव आंबाजोगाईहून सुमारे साडे अकराशे किमी अंतरावरील राजस्थान मधील नागोर जिल्ह्यातील मकराना तालुक्यातील रतनवात हे आहे.