केजक्राईम डायरी

जमिनीच्या तुकड्यासाठी नायब तहसीलदार बहिणीवर कोयत्याने वार

हल्लेखोर भावाला चार दिवसाची पोलीस कोठडी

गौतम बचुटे/केज: वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून काल दि. ६ जून रोजी दुपारी १२:०० वा. च्या दरम्यान केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर तहसील कार्यालयात त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यांच्यावर लातूर येथील लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि.६ जून रोजी दुपारी १२:०० च्या दरम्यान केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने वडिलोपार्जित जमिनीच्या घरगुती वाद आणि कौटुंबिक कलहातून तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेच्या कक्षात धारदार कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले होते. त्या हल्ल्यात नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्या हातावर आणि डोक्यात मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयातून प्रथमोचार करून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणी करून पुढील उपचारासाठी लातूर येथे हलविले होते. त्यांच्यावर लातूर येथील लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहेत.

दरम्यान केज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी लातूर येथून रुग्णालयातून त्यांचा जबाब घेऊन आज पहाटे दि. ७ जून रोजी गु. र. नं. २२२/२०२२ नुसार भा. दं. वि. ३५३, ३०७, ३३३ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्लेखोर सख्खा भाऊ मधुकर वाघ याला दि. ७ जून रोजी न्यायालयात समोर हजर केले असता त्याला दि. १० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रभारी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!