लेख

माझ्या जीवनाचा प्रवास – सिद्धेश्वर स्वामी

इयत्ता ७ वी नंतर …..

सातवी पास झाल्यानंतर एक तर अंबाजोगाई येथे शिक्षणासाठी जावे लागायचे, परंतु १९८६ साली माझ्या गावाशेजारी दिड किलोमीटर ममदापूर(पा.) येथे डॉ.आनंदराव बडगिरे सर यांनी ८ वी पासून नव्याने कै.संभाजीराव बडगिरे माध्यमिक विद्यालय सुरू केले होते, त्याठिकाणी १९८७ साली आठवी मध्ये प्रवेश घेतला. आठवी ते दहावी शिक्षण घेत रोज दीड किलोमीटर पायी जाणे येणे करत असताना ममदापूर(पा.) येथील आठवडी बाजारात पूर्वीप्रमाणे हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणे चालूच होते, तेथे काम करत असताना अनेकदा वर्गातील मुलेमुली हे हॉटेल समोरून जाताना माझ्याकडे पहायची, त्यामुळे थोडी लाजही वाटायची परंतु वडिलांच्या कोर्टातील प्रकरणामुळे घराला हातभार म्हणून लाजून उपयोग नव्हता.
हे सर्व करत असताना विद्यार्थी दशेत असतांना काही चुका होत असतात किंवा कराव्या लागल्या तशा माझ्याकडून ही झाल्या. दहावी पास झाल्यास अंबाजोगाई येथे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घ्यावा लागणार म्हणून त्यासाठी लागणारे पैसे जमा करण्यासाठी मी माझ्या गावातील मराठवाडा ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी व गौन्ड गल्ली,अंबाजोगाई येथील पोखरीकर साहेब यांचे कडे ५ ते ६ कि. मि. पोखरी येथील शेतातून अंबाजोगाई येथे रोज सकाळी पायी दूध आणण्याचे कामावर जेवण व पगार यावर राहिलो. दीड महिन्यानंतर लातूर येथे त्यांचे बांधकामाचे ठीकानी देखरेख आणि पाणी मारण्यास राहिलो. त्या कामातून मिळालेल्या पैशातून कॉलेजला जाण्यासाठी सायकल घेतली.
सन १९९० साली दहावी उत्तीर्ण झालो, खोलेश्वर कॉलेज येथे ११ वी. मध्ये प्रवेश घेतला. कॉलेज मध्ये प्रवेश घेतल्यास समजले की,गरीब विद्यार्थ्यांसाठी पंचायत समितीच्या वतीने जेवन्याची सोय केली जात होती म्हणून अर्ज केला व त्याठिकाणी माझाही नंबर लागला. रविवार पेठ अंबाजोगाई येथील श्री. शंभुलिंग शिवाचार्य मठात १९९०-९१ साली राहिलो आणि बोर्डिंग मध्ये जेवण करायचो.
दरम्यान आम्हाला कॉलेजमध्ये इंग्रजी विषय शिकवण्यासाठी कै. प्रा.मिरा कुलकर्णी मॅडम ह्या होत्या , त्यांनी वर्गात विद्यार्थ्यांना विचारले की, माझे पती वकील असून त्यांच्याकडे कोर्टात व ऑफिसला काम करण्यासाठी गरजवंत एक मुलगा पाहिजे असे विचारल्यास मी लगेच तयार झालो. अॅड.अशोक कुलकर्णी साहेब यांच्याकडे कामास १९९० साली राहिलो व कोर्टात माझे जाणे येणे सुरू राहिले. दरम्यान वडिलांनी कोर्टात बीड येथे दाखल केलेले प्रकरण अंबाजोगाई येथे नव्याने जिल्हा न्यायालय झाल्याने अंबाजोगाई येथे वर्ग झाले. प्रकरण सुरू असताना त्याप्रकणात कोणत्याही प्रकारे यश येणार नाही याची खात्री असताना सुद्धा वडील म्हणायचे कसा काय आपला निकाल आपल्या सारख्या लागणार नाही असे म्हणायचे व चुकीच्या पद्धतीने माझ्या वडिलांना व मला निकालाची खात्री ही देण्यात आली होती. शेवटी जे व्हावे तेच झाले प्रकरण पुन्हा अपिलात वडिलांच्या विरोधात गेले. तरी सुद्धा वडील माघार घ्यायला तयार नव्हते, पुन्हा खर्च करून वडिलांनी औरंगाबाद येथे उच्च न्यायालयात अपील दाखल केले पुन्हा खर्चात वाढ झाली.

दरम्यान शिक्षण घेत असताना कोर्टात काम करत असताना शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आणि मी १२ वी नापास झालो, पुढे कसेतरी १२ वी पास झालो व १२ वी नंतर च्या एलएलबी ला प्रवेश घेण्यासाठी गेलो असता त्यावर्षी नेमकी ४५℅ ची अट आली आणि त्यापेक्षा कमी टक्केवारी असल्याने माझा एलएलबी चा प्रवेश हुकला. त्यानंतर माझा १९९५ साली अंबाजोगाई वकील संघात लिपिक म्हणून कार्यरत झालो…..(क्रमशः)

लेखन:  सिद्धेश्वर स्वामी

( लिपिक वकील संघ, अंबाजोगाई)

संपादन:  प्रदीप तरकसे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!