अंबाजोगाई

देवस्थानतर्फे ‘स्वाराती’ला दहा ऑक्सिजन काॅन्संट्रेटर

अंबाजोगाई /प्रतिनिधि

येथील योगेश्वरी देवल समितीच्या वतीने शनिवारी (दि.५) स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास १० ऑक्सिजन काॅन्सट्रेटर मशीन भेट देण्यात आल्या. रुग्णांच्या उपचाराची सोय व्हावी या हेतूने देवस्थानतर्फे या मशीन देण्याचे निश्चित केले होते.

योगेश्वरी मंदिराच्या प्रांगणातच या मशीन रितसर स्वारातीच्या प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके, माजी आमदार पृथ्वीराज साठे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. संदीप निळेकर, अधिक्षक डॉ. राकेश जाधव, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती. देवल समितीचे सचिव अ‍ॅड. शरद लोमटे, संचालक भगवानराव शिंदे, उपाध्यक्ष गिरीधारीलाल भराडिया, कमलाकर चौसाळकर, सुनिल लोमटे, श्रीराम देशपांडे यांची उपस्थिती होती.
ही मशीन खुप उपयोगी असून अतिदक्षता विभागात असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन कमी पडल्यास त्याचा उपयोग होतो. हवेतील ऑक्सिजन घेवून हे यंत्र रुग्णाला पुरवते, त्यामुळे देवल समितीने स्वारातीसाठी खुप महत्वाची भेट देऊन मदत केली असल्याचे डॉ. बिराजदार यांनी सांगितले.

साडेपाच लाखाचा निधी
या दहा ऑक्सिजन काॅन्सट्रेटर मशीनसाठी देवल समितीने ५ लाख ६० हजार रुपये निधी खर्च केला आहे. या मशीनमुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे देवल समितीतर्फे या मशीन स्वाराती रुग्णालयास सुपूर्द करीत असल्याचे ॲड. शरद लोमटे यांनी सांगितले. यावेळी भगवानराव शिंदे यांचेही भाषण झाले.
अंबाजोगाई योगेश्वरी देवल समितीतर्फे स्वारातीला ऑक्सिजन काॅन्संट्रेटर मशीन सुपूर्द करताना शरद झाडके, समितीचे सचिव शरद लोमटे व सर्व संचालक.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!