कुत्र्याच्या चाव्याने महिला जखमी

गौतम बचुटे,/केज :- एका पारधी समाजातील महिलेच्या अंगावर कुत्रा सोडून त्या कुत्र्याने महिलेच्या मांडीचा लचका तोडल्याने महिला जखमी झाली आहे.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील उत्तरेश्वर पिंपरी येथील जनाबाई शिंदे ही पारधी समाजातील महिला दि. २१ मार्च सोमवार रोजी दुपारी ३:०० ते ४:०० वा च्या दरम्यान रस्त्याने जात असताना गावातील एकाने तिच्या दिशेने पाळीव कुत्रा सोडला आणि त्याला चावा घेण्याचा इशारा केल्याने त्या कुत्र्याने तिच्या डाव्या मांडीच्या मांसाचा लचका तोडला आहे. त्यामुळे ती महिला जखमी झाली आहे. तसेच कुत्र्याच्या मालकाने जखमी महिला जनाबाई शिंदे तिच्या घरी जाऊन त्या रात्री जातीवरून व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. सदर महिला जनाबाई शिंदे हिने दि. २७ मार्च रोजी केज पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणी कुत्र्याचा मालक अविनाश गाताडे व रवि गाताडे यांची चौकशी करून कारवाई करण्याची विनंती जनाबाई शिंदे हिने अर्जाद्वारे केली आहे.