परळीमहाराष्ट्र

धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघात आणखी एक मोठी वचनपूर्ती!

परळीच्या (सिरसाळा) एमआयडीसीला उद्योग विभागाची मान्यता!

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी या त्यांच्या मतदारसंघात दिलेल्या एका वचनाच्या पुर्तीच्या दिशेने राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील जमिनीवर एम आय डी सी उभारण्याच्या प्रस्तावास उद्योग विभागाने मान्यता दिली आहे. उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई यांचे खाजगी सचिव उमेश वाघ यांनी ना. मुंडेंच्या कार्यालयास पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.

परळी तालुक्यातील सिरसाळा येथील अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीवर औद्योगीक क्षेत्र – 2 अंतर्गत एम आय डी सी उभारण्याची मागणी ना. धनंजय मुंडे यांनी उद्योग विभागाला केली होती. विधानसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या अधिवेशनादरम्यान यासंदर्भात ना. देसाई यांच्याशी चर्चा करून एम आय डी सी प्रस्तावित करण्यात आली होती.

त्यानुसार यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या जमिनीची उद्योग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करून राज्य शासनाला याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला होता व त्यानुसार जमीन संपादित करण्याची प्रक्रिया उद्योग विभागामार्फत सुरू होती. ना. धनंजय मुंडे स्वतः याबाबत सातत्याने पाठपुरावा करत होते.

दरम्यान उद्योग विभागाने मोठा निर्णय घेत, परळी तालुक्यातील सिरसाळा एम आय डी सी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता दिल्याने धनंजय मुंडे यांचे वचनपूर्तीकडे हे मोठे पाऊल मानले जात आहे.

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. पंडित अण्णा मुंडे यांनी या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, असे स्वप्न पाहिले होते. या भागातील सर्वसामान्य माणसाचे दरडोई उत्पन्न वाढावे, इथल्या युवकांना इथेच रोजगार मिळावा यासाठी आपण कटिबद्ध आहोत. एम आय डी सी उभारणीच्या प्रस्तावास मान्यता मिळाल्याने परळीच्या विकासाबाबत पाहिलेले एक मोठे स्वप्न पूर्ण होताना आनंद होत असल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाष देसाई, उद्योग राज्य मंत्री ना. आदितीताई तटकरे व महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!