जिल्हाप्रमुख यांच्या निवडीला माजलगाव शहरात विरोध

माजलगाव/प्रतिनिधी:
नवीन जिल्हा प्रमुखाच्या निवडीनंतर शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आल्याची घटना माजलगाव शहरात घडली. नवीन जिल्हा प्रमुखाची करण्यात आलेली निवड रद्द करा म्हणून शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुखाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत त्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
माजलगाव येथील आप्पासाहेब जाधव यांची नुकतीच शिवसेनेच्या बीड जिल्हा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. यामुळे येथील शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार आप्पासाहेब जाधव यांनी तीन वर्षापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी या तीन वर्षात पक्षवाढीसाठी काहीच काम केले नाही त्यामुळे ही केलेली निवड तात्काळ रद्द करा अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख धनंजय पापा सोळंके यांनी केली आहे. शिवसेनेच्या या निषेध अंदोलनाने माजलगाव मधील शिवसेनेचा वाद चव्हाट्यावर आला आहे. या आंदोलनानंतर वरिष्ठ काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.