
अंबाजोगाई/प्रतिनिधी
सध्या कोरोना काळात रुग्णांना ऑक्सिजन विकत घ्यावा लागत असल्याने वृक्षांचे मानवी जीवनात किती महत्त्व आहे हे, हे सर्वांना समजून आले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी वृक्षसंवधनाची कामे होत असताना तालुक्यातील वरपगाव येथे सरासरी ४० वर्षे जुनी असलेली ११ चिंच झाडे तोडली जात असल्याची माहिती वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना समजली. याची माहिती त्यांनी वन विभागास दिली. त्यामुळे वनपाल जी. बी. कस्तुरे आणि वृक्षमित्र देशमुख यांच्या प्रयत्नातून ८ चिंचेच्या झाडांची तोड टळली.
तालुक्यातील वरपगाव ते सोमनाथ बोरगाव फाटा या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत झालेल्या रस्त्याच्या लगत आणि शेतकऱ्याच्या बांधाजवळ वरपगाव शिवारात ११ चिंच झाडे आहेत. मागील दोन-तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याचे काम होत असताना येथील ग्रामस्थांनी ही जुनी आणि मोठी झाडे तोडण्यास विरोध केला होता. मात्र, मागील दोन दिवसांपूर्वी अचानक या रस्त्यालगतच्या ११ झाडांपैकी काही झाडे तोडली जात असल्याची माहिती वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांना समजली. त्यांनी तत्काळ याची माहिती वन विभागास दिली. वनपाल गोविंद कस्तुरे व त्यांचे पथक, वृक्षमित्र देशमुख वरपगाव येथे पोहोचेपर्यंत मशीनच्या साहाय्याने तीन झाडे तोडण्यात आली. दरम्यान, गावात वन विभागाचे अधिकारी आल्याने त्या ठिकाणची अन्य वृक्षतोड टळली. गावकऱ्यांशी चर्चा करून वनपाल कस्तुरेंनी इतर वृक्ष सुरक्षित ठेवण्याच्या सूचना दिल्या. जे वृक्षतोड करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही दिला.
लोकांना वृक्षांचे महत्त्व कळेना
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले. कितीतरी लोकांचा जीव ऑक्सिजन नसल्याने गेला. मात्र लोकांना वृक्षांचे महत्त्व अजूनही कळेना. आता तरी वृक्षतोड होणार नाही याची जबाबदारी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाने घेणे गरजेचे आहे. – सुधाकर देशमुख, वृक्षमित्र.