केज मध्ये पुन्हा सिंघम आयपीएस पंकज कुमावत यांची बायो डिझेल सदृश्य बनावट इंधनावर कार्यवाही
२ लाख १६ हजार रु च्या इंधनासह ४२ लाख १६ हजारचा रु. मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात

गौतम बचुटे/केज :- सिंघम आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी पुन्हा एकदा केज मध्ये बनावट इंधनावर धाडसी कार्यवाही करून दोन ट्रक आणि २ हजार ७०० लिटर बायो डिझेल सदृश्य इंधन ताब्यात घेत ४२ लाख १६ हजार रु चा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. ५ मार्च शनिवार रोजी केज तालुक्यातील कोठी येथे बोअरवेलच्या मशीन मध्ये बायोडिझेल सदृश्य बनावट इंधन भरीत असल्याची माहिती सिंघम आयपीएस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्या नंतर पंकज कुमावत यांनी स्वतः तेथे जाऊन कार्यवाही केली त्यावेळी रात्री कोठी येथे ८:३० वा. क्र. (के ए-०१/ सी-१६०७) आणि क्र. (के ए-०१/ ए के- ५६१२) या दोन गाड्या उभ्या होत्या. त्या पैकी एका गाडीत बोअर घेण्याची मशीन होती. त्या मशीनच्या गाडीत पाईप आणि मोटारद्वारे बायोडिझेल सदृश्य बनावट इंधन भरीत होते.
पोलीसांनी ते दोन वाहने आणि त्यांचे चालक केरथोनम कानदासामी, पलनीवेल एल. लक्ष्मण, आर. दामोदरन रामलिंग तिघे रा. तामिळनाडू राज्य यांच्याकडे चौकशी केली असता हे दोन्ही ट्रक हे कर्नाटक राज्यातील एस. सेन्थलकुमार सेलवराज यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. तसेच परमेश्वर दशरथ डोंगरे रा. कोठी ता. केज जि. बीड हे बोअरवेलचे एजंट आहेत. अशी माहिती त्यांनी पोलीसांना दिली.पोलीसांनी दोन्ही वाहने व त्यांचे चालक यांना पोलीस ठाण्यात घेऊन तपासणी केली असता त्या दोन्ही वाहनात २ हजार ७०० लिटर बायो डिझेल सदृश्य बनावट इंधन ज्याची किंमत २ लाख १६ हजार रु. आणि दोन ट्रक व मशीनसह ४२ लाख १६ हजार रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला. या कार्यवाहीत सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, बालाजी दराडे, दिलीप गित्ते, अशोक नामदास, अमोल गायकवाड, वंजारे, वाहनचालक सहाय्यक फौजदार कादरी यांनी कारवाई केली. सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात दि. ६ मार्च रोजी भा.द.वि. २८५, १८८,३४ आणि जिवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ सह स्फोटक अधिनियम (द्रव्य) अधिनियम १८८४ चे कलम ९४ (१ ) ( ब ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली पहाणी
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार केज तहसीलच्या पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी पहाणी करून सदर इंधनाचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्याची कार्यवाही केली आहे.