बीडमहाराष्ट्र

शालेय पोषण आहाराची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात

बीड//प्रतिनिधी:

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत सन २०२१ मधील उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील लाभ डीबीटीद्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्याचा निर्णय शासनाद्वारे घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुवर्णमहोत्सवी, अल्पसंख्यांक, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीसह अन्य विविध शिष्यवृत्ती जमा करण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी शिक्षकांनी शर्थीचे प्रयत्न करूनही बँकांनी नियमाचा हवाला देत १० वर्षे वयोगटाच्या सामान्यतः इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे खाते काढले नाहीत. यापूर्वी काढलेल्या बँक खात्यात नियमित किमान सहा महिन्यातून एकदा व्यवहार होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे खाते बंद झाले आहे. विद्यार्थ्यांच्या उघडलेल्या बँक खात्यात किमान शिल्लक नसल्याने दंड आकारणी होते. त्यामुळे ज्यावेळी कोणतीही रक्कम जमा केली जाते अशावेळी सर्वप्रथम दंडाची आकारणी कपात केल्याने लाभार्थ्यांचे नुकसान होते व पालकांचा रोष शिक्षकांवर येतो.अनेक बँका विद्यार्थ्यांचे शुन्य शिलकीवर खाते काढण्यासाठी अनुत्सूूक असतात. शासन आदेशानुसार शालेय पोषण आहाराचा उन्हाळी सुट्टीतील लाभ बँक खात्यात एकवेळ जमा करण्याचे नमूद आहे. लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात केवळ उन्हाळी सुट्टी कालावधीतील रक्कम जमा करावयाची आहे.दोन महिन्यातील अंदाजित कार्य दिवस ३५ गृहीत धरल्यास इयत्ता १ ते ५ साठी दर दिवशी ४.४८ रुपये दराने एकूण फक्त १५६ रुपये ८० पैसे आणि इयत्ता ६ ते ८ वी साठी दर दिवशी ६.७१ रुपये दराने एकूण फक्त २३४ रुपये ८५ पैसे जमा होतील. केवळ अशा अत्यल्प रोख लाभासाठी रोज मोलमजुरी करणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याचे बँकेत खाते काढण्यासाठी मजुरी किंवा दैनंदिन कामे टाकून जाणे कितपत योग्य आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
मागील वर्षी उन्हाळी सुट्टी कालावधीचा पोषण आहार विद्यार्थ्यांना शाळेतून वितरित करण्यात आला. तिच पद्धती योग्य आहे. एकदा जाऊन बँकेत काम होत नाही असा अनुभव असल्याने किमान दोन ते तीन वेळा खाते काढण्यासाठी, नंतर खाते पुस्तक आणणे,अशा कामासाठी शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी पालकांना बँकेत वारंवार जाणे व त्यामुळे त्यांच्या रोजमजुरीची अडचण करणे संयुक्तिक होईल का ? या बाबींचाही विचार करणे गरजेचे आहे. वस्तुनिष्ठ विचार करून विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे शालेय पोषण आहाराचा उन्हाळी सुट्टीतील लाभ जमा करण्याचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी कळविले आहे.

शिक्षकांकडे जबाबदारी सोपवणे केवळ अनाकलनीय

लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँकखाते आधार लिंक नसण्याबाबत शिक्षकांना जबाबदार धरणे किंवा त्यासाठी शिक्षकांकडे जबाबदारी सोपविणे केवळ अनाकलनीय आहे. आधार कार्डातील नोंदी अद्यावत करणे पालकांचे काम आहे. त्यांच्या वैयक्तिक अडचणीमुळे ते वेळ देऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यावत करण्यासह खात्याला लिंक करण्यासाठी संपूर्णपणे शिक्षकांना जबाबदार धरण्याची शासन-प्रशासन यंत्रणेची भूमिका शिक्षकांना नाहक वेठीस धरणारी आहे

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!