शिक्षण विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे वेतन मागील आठरा महिन्यांपासून मिळेना

अंबाजोगाई/ प्रतिनिधी
बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचारी हे जानेवारी-२०२० या एका महिन्याच्या प्रलंबित वेतनापासून वंचित आहेत.तरी या कर्मचाऱ्यांना तात्काळ सदर एका महिन्याचे वेतन अदा करण्यात यावे अशी अपेक्षा व मागणी बीड जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे वतीने करण्यात येत आहे.
शासकीय कर्मचारी यांचे वेतन ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यासाठी शासनाने सेवार्थ प्रणालीचा वापर सुरू केला आहे.अशाच प्रकारे ग्रामविकास विभागाने सेवार्थ प्रणालीच्या धर्तीवर पंचायतराज सेवार्थ प्रणालीची सुरूवात केलेली आहे.हि संगणकीकृत वेतन प्रणाली कर्मचा-यांचे वेतन वेळेवर व्हावे यासाठी सुरूवात केलेली आहे.परंतू,बीड जिल्हा परिषदेतील चतुर्थश्रेणी कर्मचारी माञ याला अपवाद ठरले आहेत.पंचायतराज सेवार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परिषदेच्या १ ते ४ या संवर्गातील कर्मचा-यांचे वेतन अदा होत असते.मागील वर्षी जानेवारी २०२० मध्ये पण,अशाच प्रकारे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे जानेवारी महिन्याचे वेतन देयके तयार करण्यात आली.परंतू,बीड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व जिल्हा कोषागार कार्यालय यांच्या काही तांत्रिक चुकीमुळे जानेवारी २०२० या एका महिन्याचे वेतन अद्याप ही होऊ शकलेले नाही.त्यानंतर सदर वेतन मिळावे यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी वेळोवेळी जिल्हा परिषद,जिल्हा कोषागार कार्यालय व महालेखाकार कार्यालय,नागपूर अशा तीनही स्तरावर पाठपुरावा केलेला आहे.परंतू,मागील आठरा महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या अंदाजे १५० चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे जानेवारी २०२० या एका महिन्याचे वेतन प्रलंबितच आहे.जर चतुर्थश्रेणी कमचा-यांऐवजी इतर कर्मचा-यांचे एवढ्या कालावधीसाठीचे वेतन प्रलंबित राहिले असते.तर प्रशासनाने इतके दुर्लक्ष केले असता का,असा प्रश्न चतुर्थश्रेणी कर्मचारी व संघटना विचारत आहेत.तरी आठरा महिन्यानंतर तरी बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे एक महिन्याचे प्रलंबित वेतन अदा करण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा शाखेने निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे,अन्यथा नाविलाजास्तव संघटनेला जानेवारी-२०२० च्या प्रलंबित वेतनासाठी आंदोलन करावे लागेल अशी विनंती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.तरी सदरचे एक महिन्याचे प्रलंबित वेतन लवकरात लवकर जमा व्हावे अशी अपेक्षा व मागणी बीड जिल्हा परिषदेच्या चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे वतीने करण्यात येत आहे.