ओबीसी आरक्षणाला स्थगिती आणणारा याचिकाकर्ता भाजपाचा हस्तक-कल्याण आखाडे

बीड/प्रतिनिधी:
ओबीसी आरक्षणप्रश्नी भारतीय जनता पार्टीकडून छेडण्यात येत असलेले आंदोलन म्हणजे पुतना मावशीचा पान्हा असून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती आणणारा याचिकाकर्ता हा भाजपाचा हस्तक असल्याचा आरोप सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, शिशा तो टूटा है, लेकिन पत्थर कहासे आया ! आरसा तर फुटला पण या घटनेच्या कटकारस्थानामागे कोण आहे याचा शोध घेऊन पर्दाफाश होणे गरजेचे आहे. याचिकाकर्ता हा तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसचा असला तरी हे कृत्य करण्यासाठी त्यास भाजपा नेत्यांचीच फूस असल्याचे तसेच तो भाजपाचा हस्तक असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एकीकडे ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यासाठी छुप्या खोड्या करायच्या आणि दुसरीकडे ओबीसींचा पुळका असल्याचा आव आणून आंदोलन छेडण्याचे ढोंग भाजपा करीत आहे. असे पत्रकात नमुद करण्यात आले आहे.