दोन लाचखोर पोलिसांचे केले निलंबन

बीड/प्रतिनिधी:
राखेची वाहतूक सुरू ठेवण्यासाठी ९ हजार रुपयांची लाच मागणी करून सहा हजार रुपये स्वीकारताना दोन पोलिसांसह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उस्मानाबाद येथील पथकाने २३ जूनला सिरसाळा (ता.परळी) येथे रंगेहाथ पकडले होते. लाच घेणाऱ्या दोन पोलिसांचे एसपी आर. राजा यांनी गुरुवारी निलंबन केले. (police Suspended)
दाेन पोलिसांसह खासगी व्यक्ती अशा तिघांना गुरुवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी दिली. राखेची वाहतुकीसाठी ३ टिप्पर सिरसाळा ठाण्याच्या हद्दीतून चालू देण्यासाठी पोलिस अंमलदार उमेश कनकावार, गजानन अशोक येरडलावर यांनी ९ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती सहा हजार रुपये लाच देण्याचे ठरले. याची तक्रार उस्मानाबाद ‘एसीबी’ला प्राप्त झाली होती. ‘एसीबी’ने तक्रारीची पडताळणी केली आणि बुधवारी दुपारी सिरसाळ्याच्या सोनपेठ चौकात सापळा रचला. यावेळी अंमलदार कनकावार आणि येरडलावर यांच्या वतीने सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती नदीम मोसीन पठाणला रंगेहाथ पकडले.