शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी धसांचा पुढाकर

प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह २१ जूनपासून क्लासेस सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पाटोदा/प्रतिनिधी:
राज्यातील जवळपास १ लाख खासगी कोचिंग क्लासेस मार्च २०२० पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून क्लासेस बंद असल्यामुळे क्लासेस संचालक व त्यावर अवलंबून असणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलेली असून त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समितीने आमदार सुरेश धस यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार धस यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत पाठपुरावा केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या या निवेदनात आमदार सुरेश धस यांनी म्हंटले आहे की, क्लासेस संचालक हे शिक्षकांचे पगार, क्लासेस जागा भाडे, नोकरवर्गाचा पगार, दैनंदिन खर्च, विद्युत बिल आदींच्या आर्थिक ओझ्याने हवालदिल झालेले आहेत. आर्थिक टंचाईचा सामना करताना मानसिक त्रास देखील खाजगी क्लासेस संचालकांना सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत कोणतेही आर्थिक पॅकेज अद्याप जाहीर केलेले नाही. कित्येक क्लास बंद पडत असून काही क्लासेस संचालकांनी फर्निचर व इतर साहित्य विक्रीस काढून उदरनिर्वाह भागविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोचिंग क्लासेस व क्लासेसवर आधारित रोजगार, आर्थिक घडी विस्कटत असल्याने राज्यातील ६ खाजगी क्लासेस संघटना एकत्रित आल्या असून त्यांनी महाराष्ट्र कोचिंग क्लासेस कृती समिती स्थापन केलेली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्याकडे ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू केलेली आहे मात्र ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हिटीची समस्या असल्याने आजही कित्येक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत दरी निर्माण होत असून विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड तयार होण्याची शक्यता आहे. सोबतच ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे पाठीच्या कणा, डोळ्यांचे आजारासह इतर आरोग्याच्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढत चालल्या आहेत. खाजगी कोचिंग क्लासेस द्वारे आवश्यक असणारे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. यामुळे २१ जून २०२१ पासून सर्व खाजगी कोचिंग क्लासेसला सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी माजीमंत्री तथा विधान परिषदेचे सदस्य सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अडचणीत असलेल्या खासगी क्लासेसचालकांना दिलासा देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी तातडीने क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी धस यांनी केली आहे.