लेख

लोकनेते राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज या नावाची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे त्यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही, पण खंत ही आहे की आजची तरुण पिढी त्यांना केवळ नावाने ओळखते. त्यांची कार्ये, त्यांनी मांडलेले विचार यांची त्यांना म्हणावी तितकी माहिती नाही. वाळीत टाकल्याप्रमाणे जगणाऱ्या दलित समाजाच्या त्या काळी खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या या लोकनायकाची, जाती पातीच्या अंधाऱ्या जगात पुन्हा अडकत जाणाऱ्या महाराष्ट्र देशाला आज पुन्हा नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. त्यानिमित्त…
छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर अनेक राजांचा इतिहास अन्याय-अत्याचार व जुलमी राजवटीचा आहे. एकाधिकारशाहीचा, हुकूमशाहीचा आहे; परंतु छत्रपती राजर्षी शाहू महाराज मात्र याला अपवाद आहेत. हा राजा लोकशाहीचा, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा आहे, हे “एकवेळ गादी सोडीन; पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही’’ या त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते. 
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील, राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले. इ.स.१८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या हातात सत्तेची सूत्रे येताच त्यांनी पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानातील प्रजेच्या हलाखीची पाहणी केली. संस्थानात साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प, मागासलेला समाज, अप्रवाही, जातीपातींनी दुभंगलेला व जातीयवादाने फार पोखरलेला होता. शेकडो वर्षे अस्पृश्य समाज, बहुजन समाज ज्ञान, सत्ता, संपत्ती, शिक्षण अशा अनेक गोष्टींपासून वंचित राहिला होता. चातुवर्णव्यवस्थेमुळे सामाजिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात मागे होता. अस्पृश्य, गरीब, शेतकरी, मजूर यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत होते. सामान्य जनता भयानक दारिद्र्य, अज्ञानाच्या, अंधश्रद्धा, रूढींच्या खाईत बुडाली होती. शिक्षण क्षेत्रात बहुजन समाज बोटावर मोजता येईल इतकाच होता. पाणी, रस्ते, शेती, व्यापार, कला अविकसित होत्या, म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा उपयोग या रंजल्या- गांजलेल्या लोकांसाठी केला, हे आजच्या स्वार्थी राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. 
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली. सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली.

सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण :

राजर्षी शाहू महाराजांच्या काळात बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणाशिवाय सुधारणा होणार नाही म्हणून त्यांनी शिक्षणाला महत्व देऊन १९०७ मध्ये “मिस क्लार्क बोर्डिंग’ नावाचे वसतिगृह उघडले. शिक्षणाचा प्रचार- प्रसार व्हावा म्हणून १९१६ मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून शाळा, महाविद्यालये, बोर्डिंग, शिष्यवृत्त्या सुरू केल्या. तसे आदेश त्यांनी जारी केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. स्त्रीमुक्तीची सुरुवातही महाराजांनी आपल्या घरापासूनच केली. महाराजांनी आपल्या सुनबाई इंदुमती राणीसाहेब यांना अकाली वैधव्य प्राप्त झाल्यानंतर त्यांना शिक्षण दिले. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन राजाराम कॉलेजमध्ये मुलींना फी माफी दिली. स्त्रियांना शिक्षण दिले. धर्माच्या नावाखाली मुले-मुली वाहण्याची अघोरी प्रथा बंद केली. वाघ्या-मुरळी प्रतिबंधक कायदा केला. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणा-या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.

आरक्षणातून प्रगती :

चातुर्वर्णव्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर बोकाळलेली असल्यामुळे आणि प्रत्येकाला जातीनुसार काम वाटून दिले असल्यामुळे अस्पृश्य समाजात प्रगती होत नव्हती. शिक्षण नव्हते. खालच्या वर्गातील माणूस वरच्या वर्गात जाऊ शकत नव्हता. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेंव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला.

गुन्हेगारीचे निर्मुलन :

तत्कालीन परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला, त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला. त्यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वणवण भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

स्पृश्योद्धाराचे कार्य :

१८९९ साली कोल्हापूरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापूरातील ब्राह्मण वर्गाने शाहू महाराजांचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र लेखले. राजालाच जर अशी वागणूक मिळत असेल तर प्रजेच काय ? असा विचार शाहू महाराजांनी त्यावेळी केला. वैयक्तीक अपमानाकडे सुद्धा व्यापक दृष्टिकोनातून बघणारा हा राजा होता. वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म.फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल’ ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू’ पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता. अस्पृश्य समाजातील व इतर गरीब समाजातील लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या. वकिलीच्या सनदा दिल्या. जातीयता कमी करण्याचा प्रयत्न करून त्यांना मान सन्मानाचे जीवन दिले. आज देशात वाढत असलेली जातीयता, हतबलता ही आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन शाहू महाराजांचे कार्य लक्षात घेण्यासारखे आहे. 

राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर :

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देवून त्यांनी आर्थिक सहकार्यही केले होते. छत्रपती शाहू महाराजांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप आदर आणि अभिमान होता. म्हणून ते स्वतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी मुंबई येथे त्यांच्या घरी गेले. त्यांचा सत्कार केला. डॉ.बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना तत्काळ आर्थिक मदत केली.

आंतरजातीय विवाहाला मान्यता :

स्त्रियांच्या प्रगतीसाठी आणि जातीयता नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी कार्य केले. १९१८ साली त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. स्वतःच्या घरात धनगर घराण्याची नाते जुळवून कृतीत उतरवून आणला. जातीयता कमी व्हावी म्हणून त्यांनी स्वतः काही आंतरजातीय विवाह घडवून आणले. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली. १९२० मध्ये घटस्फोटाचा कायदा केला. हा राजा स्त्रियांचा सच्चा पाठीराखा होता. आज देशात होत असलेल्या स्त्रियावरील अन्याय, अत्याचारावरून आजच्या राज्यकर्त्यांचे डोळे उघडणे गरजेचे आहे. 

व्यापार, कला, क्रीडा, साहित्य व इतर कलांना मदत :

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना व्यापार, कला, नाट्य, संगीत या विषयीही आवड व आदर होता. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. अल्लादिया खान यांच्यासारख्या गायकाला, बाबूराव पेंटरला आश्रय दिला. नाटक कंपन्या सुरू केल्या. 
राजर्षी शाहू महाराजांनी व्यापारी क्षेत्रात गरुड झेप घेऊन सूतगिरण्या, कापडगिरण्या वाढविल्या. शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी बंधारे बांधले. शेतीसाठी कर्ज, शेतीच्या विकासासाठी संशोधन, नाविन्यता आणि तंत्रज्ञानाच्या वापरास चालना, भविष्यात दुष्काळाला सामोरे जावे लागू नये यासाठी राधानगरी सारख्या धरणांची बांधणी असे उपक्रम त्यांनी यशस्वीरित्या राबविले.
अशाप्रकारे राजर्षी शाहू महाराज हे सामान्य माणसात मिळणारे, सामान्यांसाठी झटणारे राजा होते. त्यांच्यासर्वाभिमुख विकासाच्या दृष्टिकोनामुळे इतिहासकारांनी त्यांची नोंद लोककल्याणकारी राज्यकर्ता म्हणून केली आहे. ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. आपल्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी शिक्षण, कृषी, उद्योग, कला, क्रीडा व आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान आणि चालना दिली. सामाजिक लोकशाही निर्मितीसाठी शाहू महाराजांनी अतोनात कष्ट उपसले. सर्वांना न्याय मिळावा, माणुसकीचे हक्क मिळावेत, अस्पृश्‍यांना समानतेची व माणुसकीची वागणूक मिळावी, वैज्ञानिकता त्यांच्या अंगी यावी म्हणून त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग केला. यावरून शाहू महाराजांचे मोठेपण हे लक्षात यायला लागते. आज मात्र आम्ही व आमच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श बाजूला ठेवला आहे. त्यांचे नाव घेऊन आम्हीही त्यांचेच आहोत म्हणणारेही त्यांच्या विचाराने वागत नाहीत उलट आपल्या सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. मानवी मूल्य पायदळी तुडवताना दिसतात. ज्या शाहू महाराजांनी लोकशाही निर्मितीसाठी कष्ट उपसले, त्याच लोकशाहीचे धिंडवडे काढताना आजचे राज्यकर्ते आम्हाला दिसत आहेत. आम्ही समाजाचे काही देणे आहोत, समाजाच्या प्रगतीसाठी आपलेही काही योगदान असावे, असे मात्र आत्ताच्या कुठल्याच राज्यकर्त्यांना वाटत नाही एवढे भयावह चित्र डोळ्यासमोर उभे राहते. स्वार्थासाठी, मतलबासाठी, जातीसाठी, धर्मासाठी राजकारण करणे चालू आहे परंतु मानवतेसाठी, मानवी कल्याणासाठी राजकारण करावे लागते हे मात्र त्यांनी राजर्षी शाहू महाराजांकडूनच शिकायला हवे, त्या पद्धतीनेच आपली सत्ता पुढे घेऊन जायला हवी व सामान्याचे हित जोपासायला हवे. त्यांचे आदर्श कार्य डोळ्यासमोर ठेवून वर्तमान सरकारांनी राज्यकारभार केल्यास ख-या अर्थाने रयतेचे राज्य होईल. कोरोना आपत्तीत जनतेला दिलासा, रोजगार गेलेल्या लोकांना काम, छोटे-मोठे उद्योग करणा-यांना आर्थिक सहाय्य करावे. शेतक-यांसाठी पाणी, वीज आणि बियाणांची उपलब्धता, आपत्तीग्रस्तांना मदत करावी. मोफत लसीकरण, गरीब-वंचित विद्यार्थ्यांना स्मार्टफोनचे वाटप, इंटरनेटची प्रभावी व्यवस्था, ऑनलाइन अध्यन-अध्यापन-मूल्यांकन प्रभावी आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे. वेगवेगळ्या प्रशिक्षण संस्था न काढता सर्व मागासलेल्या जाती-जमातींसाठी एकच संस्था असावी. आज त्यांच्या विचारांची, आचारांची व कृतीची देशाला गरज आहे. प्रत्येक मानवाने त्यांच्या विचाराने कार्य केले तर देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. अशा या राजर्षी व्यक्तिमत्त्वास मानाचे अभिवादन !

सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
संपर्क- ९४०३६५०७२२

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!