केज

देवगाव येथे रमाई घरकुल योजनेचा निधी हडपल्या प्रकरणी चौकशीचे आदेश

कार्यवाहीकडे केज तालुक्याचे लक्ष

गौतम बचुटे/केज:  मंजूर घरकुलाचे बांधकाम न करता कागदोपत्री बांधकाम झाल्याचे दाखवून शासनाचा निधी हडप केल्याची घटना केज तालुक्यातील देवगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी देवगाव येथील महादेव दशरथ गायकवाड यांनी गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्याकडे तक्रार करुन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. दरम्यान तक्रार प्राप्त होताच गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

केज तालुक्यातील देवगाव येथील सरपंच सुरेखा शिवाजी गायकवाड यांचे पती शिवाजी आण्णा गायकवाड हे रोजगार सेवक म्हणून काम करतात. शिवाजी आण्णा गायकवाड यांनी सरपंचपती व रोजगार सेवक असल्याचा गैरवापर करत ग्रामसेवक खामकर यांना हाताशी धरून रमाई आवास घरकुल योजनेत २०१९-२० वर्षात सहा घरकुल मंजूर करुन घेतले. या सर्व लाभार्थ्यांनी पुर्वी घरकुलाचा लाभ मिळवीला आहे. असे असतांना विद्यमान सरपंच सुरेखा शिवाजी गायकवाड व त्यांचे पती तथा देवगाव ग्रामपंचायतचे रोजगार सेवक शिवाजी आण्णा गायकवाड यांनी ग्रामसेवक खामकर यांना हाताशी धरून बोगस पी. टी. आर तयार करुन घरकुलाचा निधी ‍परस्पर हडप केला आहे. देवगाव येथील रमाई घरकुल बांधकामाची चौकशी करून शासनाचा निधी हडप करण्यासाठी मदत करणाऱ्या सरपंच सुरेखा शिवाजी गायकवाड, रोजगार सेवक शिवाजी आण्णा गायकवाड, ग्रामसेवक खामकर, तांत्रीक अधिकारी ढाकणे यांच्यासह बोगस निधी मिळण्यासाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची १५ फेब्रुवारी पर्यंत चौकशी करून योग्य ती कठोर कार्यवाही करावी. अन्यथा १६ फेब्रुवारी नंतर अंदोलन करण्यात येईल असा ईशारा तक्रारदार महादेव दशरथ गायकवाड यांनी गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

दोषींवर कार्यवाही करण्यात येईल

देवगाव घरकुल प्रकरणी महादेव गायकवाड यांची तक्रार प्राप्त झाली आहे. या संदर्भात विस्तार अधिकारी यांना तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कार्यवाही करण्यात येईल.

– विठ्ठल नागरगोजे (गटविकास अधिकारी, केज)

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!