महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

चंदीगड: महान धावपटू मिल्खा सिंग (९१) यांचे शुक्रवारी रात्री ११:२४ वा. रुग्णालयात निधन झाले. ‘फ्लाईंग सिख’ अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांना मोहालीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. अचानक ताप आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिल्खांच्या नावावर अनेक विक्रम आहेत. कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे ते पहिले धावपटू होते. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकली. तथापि, त्यापेक्षा त्यांची जास्त चर्चा रोम ऑलिम्पिकमध्ये पदक हुकल्यामुळे होती. १९६० मध्ये रोमला जाण्याच्या दोन वर्षे आधीच मिल्खांनी कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे ते ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकतील, अशी त्यांनाच नव्हे तर संपूर्ण देशाला अपेक्षा होती.
‘फ्लाईंग सिख’ उपाधी
१९६० साली भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत होणारे सामने वरकरणी मैत्रीपूर्ण वाटत असले, तरी ते प्रतिष्ठेचे होते. त्यामुळे जवाहरलाल नेहरु यांनी मिल्खा सिंग यांना या स्पर्धेत खेळण्याची विनंती केली होती. त्यावेळी मिल्खा भारतातील सर्वाधिक वेगवान धावपटू होते. परंतु त्यांची या स्पर्धेत भाग घेण्याची मूळीच इच्छा नव्हती. पण, मिल्खा सिंग यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच होते. अखेर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनीच त्यांना विनंती केली. नेहरूंच्या आग्रहाखातर आणि केवळ देशावरील प्रेमापोटी त्यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानात पोहोचताच ‘मिल्खा-अब्दुल खालिद की टक्कर’ असे या स्पर्धेचे वर्णन होऊ लागले. पण वाऱ्याच्या वेगाने धावून मिल्खा यांनी अब्दुल खालिदला हरवले. त्यावेळी पाकिस्तानात भारताचा तिरंगा फडकावणाऱ्यामिल्खांना पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी ‘फ्लाईंग सिख’ ही उपाधी दिली.